पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी आवश्यक असलेली ईव्हीएम यंत्रे व निवडणूक अनुषंगिक साहित्य महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार बीड व कोल्हापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यांतून पिंपरी येथे कडेकोट पोलीस बंदोबस्तात सुरक्षितरीत्या दाखल करण्यात आले.
बीड जिल्ह्यातील गेवराई, पाटोदा व आष्टी तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी, आजरा, कागल, भुदरगड, गडहिंग्लज व चंदगड येथील ईव्हीएम यंत्रांचा या ताफ्यात समावेश होता. हे साहित्य चार स्वतंत्र वाहनांद्वारे, पूर्वनियोजित मार्ग व नकाशानुसार पिंपरी येथे आणण्यात आले.
या संपूर्ण प्रक्रियेसाठी नियुक्त नोडल अधिकारी प्रमोद ओंभासे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक नोडल अधिकारी सुनील पवार, अभिमान भोसले, संतोष कुदळे, राहुल पाटील व इंद्रजीत जाधव यांच्या समन्वयाने सुमारे २७ महापालिका कर्मचारी, १२ व्हिडिओ कॅमेरामन तसेच १६ सशस्त्र पोलिस कर्मचारी असा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या निर्देशानुसार तयार करण्यात आलेल्या सुसज्ज स्ट्राँग रूममध्ये सर्व ईव्हीएम यंत्रे सुरक्षित ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यावेळी स्थानिक राजकीय पक्षांच्या नियुक्त पदाधिकाऱ्यांना पूर्वसूचना देऊन नियमानुसार पाहणीसाठी उपस्थित राहण्याची संधी देण्यात आली.
सर्व वाहनांच्या सीलबंद स्थितीची खातरजमा उपस्थित पोलिस अधिकारी व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या समक्ष करण्यात आली. त्यानंतर स्ट्राँग रूम अधिकारी संजय काशिद, सत्वशील शितोळे व इतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत ईव्हीएम यंत्रे सुरक्षितरीत्या उतरविण्यात आली. सध्या सर्व ईव्हीएम यंत्रे निवडणूक आयोगाच्या नियमावलीनुसार सीलबंद अवस्थेत सुरक्षित ठेवण्यात आली असून संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक व नियमानुसार पार पाडण्यात आली आहे.


