Monday, December 4, 2023
Homeताजी बातमीपिंपरी चिंचवड आयडॉल स्पर्धा पियुष भोंडे 'मोरया करंडक' चा महाविजेता

पिंपरी चिंचवड आयडॉल स्पर्धा पियुष भोंडे ‘मोरया करंडक’ चा महाविजेता

पिंपरी चिंचवड मधून उत्कृष्ट पार्श्व गायक तयार व्हावेत – भाऊसाहेब भोईर

पिंपरी चिंचवड शहरातून आशा भोसले, लता मंगेशकर, मोहम्मद रफी, किशोरदा, मुकेश यांच्या सारखे पार्श्व गायक व गायिका तयार व्हावेत हा पिंपरी चिंचवड आयडॉल स्पर्धेचा मुख्य हेतू आहे. अशा गायकांना उच्च दर्जाचे सांगितीक प्रशिक्षण मिळावे या करिता प्रयत्न करणार आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी केले. पिंपरी चिंचवड आयडॉल ‘मोरया करंडक २०२३’ चा महाविजेता पियुष भोंडे याचा सत्कार करताना भाऊसाहेब भोईर बोलत होते.

पिंपरी चिंचवड आयडॉल २०२३ मोरया करंडक स्पर्धेची अंतिम फेरी आणि बक्षीस वितरण आकुर्डी येथील ग. दि. माडगुळकर नाट्यगृह येथे झाले. यावेळी महा विजेत्या पियुष भोंडे याला स्मृती चिन्ह आणि रोख पंचवीस हजार रुपये एमआयडीसीचे पुणे विभागीय अधिकारी सचिन बारवकर यांच्या हस्ते देऊन गौरविण्यातआले. तसेच नऊ उपविजेत्यांना सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच विशेष तीन स्पर्धकांचा भाऊसाहेब भोईर यांच्या हस्ते गौरविण्यात आले. स्पर्धेचे हे आठवे वर्ष होते. यावेळी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष विशाल वाकडकर, सह्याद्री प्रतिष्ठान मुळशी अध्यक्ष अनिल पवार, गौरव घुले, मंजूल प्रकाशनचे चेतन कोळी, मयूर जाधव, प्रसाद कोलते, मानसी भोईर घुले आदी उपस्थित होते.

या वर्षीच्या स्पर्धेत ९८ स्पर्धकांनी भाग घेतला. स्पर्धकांची निवड चाचणी (ऑडिशन) १५ ते १६ जुलै २०२३ घेण्यात आली. यावेळी गायिका वैजयंती भालेराव, गायक-संगीतकार विजय आवळे यांनी परीक्षण केले. पहिल्या फेरीसाठी ६० स्पर्धकांची निवड करण्यात आली. स्पर्धेच्या पहिल्या फेरीतून ४० स्पर्धकांची निवड करण्यात आली. दुसऱ्या फेरीतून २५ स्पर्धकांची उपांत्य फेरीसाठी निवड करण्यात आली. उपांत्य फेरी मधून अंतिम फेरी साठी प्रेमिला क्षीरसागर, चैताली दाभाडे-मोकाशी, अजिंक्य देशपांडे, सार्थक पवार, पियुष भोंडे, अस्मिता दीपक लगड, निशा गायकवाड, सानिका अभंग, वर्षा शिशुपाल, पूनम धसे या दहा जणांची निवड करण्यात आली. सर्वोत्कृष्ट दहा स्पर्धकांच्या तीन फेऱ्या घेण्यात आल्या. पहिल्या फेरी मध्ये क्लासिकल आणि सेमी क्लासिकल, दुसऱ्या फेरी मध्ये सुफी, कव्वाली आणि मुजरा प्रकारातील चित्रपट आणि अल्बम गीते व तिसऱ्या फेरी मध्ये मराठी तसेच लोकगीते सादर करण्यात आली. सर्व स्पर्धकांनी अतिशय उत्तम व दर्जेदार गीते सादर करून रसिक प्रेक्षकांची मने जिंकली. तसेच अंतिम फेरीतील परीक्षक आणि लोकप्रिय संगीतकार हर्षित अभिराज यांनी स्पर्धक पुनम यांच्यासोबत स्वतः संगीतबद्ध केलेल्या ‘दूरच्या रानात …’ आणि ‘ढगान आभाळ दाटलया…’ परीक्षक मंजुश्री ओक ‘दमा दम मस्त कलंदर’ हे गीत सादर केले. परीक्षक चैतन्य आडकर यांनी भाऊसाहेब भोईर निर्मित चित्रपट ‘थापाड्या’ यातील गीत या स्पर्धेतील गायिका निशा गायकवाड यांनी सादर केले. मानसी भोईर – घुले यांनी आपल्या वेगळ्या गायकीतून उपस्थित रसिकांची मने जिंकली.

स्पर्धेचे संगीत संयोजन प्रशांत साळवी यांनी केले तर विजय आवळे, हर्षित अभिराज, तेजस चव्हाण, मंजुश्री ओक, वैजयंती भालेराव, अरविंद अगरवाल, आरती दीक्षित, चैतन्य आडकर, रश्मी मुखर्जी यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. तसेच आरती क्षेत्रे, अमृता क्षेत्रे, पृथ्वीराज इंगळे या विशेष स्पर्धकांनी आपली गायनकला सादर केली. महाअंतिम फेरी साठी आरजे राहुल यांनी सूत्रसंचालन केले.

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली हर्षवर्धन भाऊसाहेब भोईर यांनी आयोजित केलेले या स्पर्धेचे आठवे वर्ष होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments