Saturday, March 22, 2025
Homeमहाराष्ट्रपिंपरी-चिंचवड शहरात दर सोमवारी ‘नो हॉर्न डे’ साजरा करणार .. वाहतूक पोलिसांचा...

पिंपरी-चिंचवड शहरात दर सोमवारी ‘नो हॉर्न डे’ साजरा करणार .. वाहतूक पोलिसांचा निर्णय

दररोज लाखो वाहनांच्या हॉर्नमुळे होणाऱ्या गोंगाटापासून एक दिवस तरी सुटका मिळण्यासाठी पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी अनोखी शक्कल लढवली आहे. दर सोमवारी ‘नो हॉर्न डे’ उपक्रम साजरा करण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला आहे.

या उपक्रमांतर्गत सोमवारी कोणत्याही वाहनचालकाने हॉर्न वाजवू नये, यासाठी शाळा, कॉलेज, आयटी इंडस्ट्री, एमआयडीसी येथे जाऊन वाहतूक पोलिस ‘नो हॉर्न डे’संदर्भात जनजागृती करणार आहेत.

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात सर्वांनाच कामावर येण्या-जाण्याची घाई असते. मात्र, वाहतूक कोंडीमुळे या गोष्टी वेळेत होणे शक्य नसते. वाहतूक कोंडीत अडकल्यावर प्रत्येक वाहनचालक वाहनाला जागा मिळावी, यासाठी ‘हॉर्न’ वाजवतात. त्यामुळे ध्वनिप्रदूषण होते. ध्वनिप्रदूषणाचा त्रास वाहनचालकासह रस्त्यावर; तसेच आसपास असणाऱ्या सर्वच नागरिकांना सहन करावा लागतो. यामुळे अनेकांना कानाच्या आजारांसह मानसिक विकार झाल्याची उदाहरणे समोर आली आहेत. याबाबत प्रादेशिक परिवहन कार्यालय, सामाजिक संस्था; तसेच वाहतूक संस्थांकडून वारंवार जनजागृती करण्यात आली आहे. मात्र, वाहनचालक याकडे नेहमीच दुर्लक्ष करतात. त्यामुळे शहरात वाहतूककोंडी होणाऱ्या अनेक ठिकाणी सातत्याने ध्वनिप्रदूषण होते.

यावर उपाय म्हणून प्राथमिक स्वरूपात दर सोमवारी वाहनचालकांनी ‘नो हॉर्न डे’ पाळावा, असा निर्णय पिंपरी-चिंचवड शहर वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. हॉर्नच्या गोंगाटमुळे गर्भवती महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, हृदयरोग असणाऱ्या सर्वच नागरिकांना त्रास होतो. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहनांची वाढती संख्या पाहता दररोज कमीत कमी एक कोटी वेळा हॉर्न वाजवला जातो. याचा आरोग्यावर थेट परिणाम होतो. त्यामुळे पुण्यात १२ सप्टेंबर २०१८ रोजी पुण्यात पहिल्यांदा ‘नो हॉर्न डे’ साजरा करण्यात आला होता.- संजय राऊत, निवृत्त आरटीओ अधिकारी व ‘नो हॉर्न डे’चे प्रणेते

हॉर्न वाजविण्याचे तोटे…

  • रस्त्यावर वाढणारा गोंगाट
  • रस्त्यावर होणारे वाद
  • अपघातांची वाढती संख्या
  • नागरिकांच्या आरोग्यावर होणारा परिणाम

शहरातील वाहनांची संख्या
एकूण वाहने
सुमारे २४ लाख
रस्त्यावरील वाहने
सुमारे १५ लाख

घरातून बाहेर पडल्यानंतर इच्छित स्थळी जाईपर्यंत वाहनचालक प्रत्येक किलोमीटरला किमान पाच वेळा ‘हॉर्न’ वाजवतो. यामुळे शहरातील वायू प्रदूषणात खूप वाढ होत असून, वाहनचालकांचे मानसिक स्वास्थ्यही खराब होत असते. यामुळे वाहनचालकांना विनंती असून, आपण एक दिवस अजिबात ‘हॉर्न’ वाजविला नाही, तर हळूहळू हॉर्न वाजवण्याची सवय कमी होत जाईल, असा विश्वास वाटतो.- बापू बांगर, पोलिस उपायुक्त, वाहतूक विभाग, पिंपरी-चिंचवड

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments