Friday, September 29, 2023
Homeताजी बातमीपिंपरी चिंचवडच्या सर्व मुख्य मार्गावर महिलांसाठी स्वच्छतागृहे उभारा

पिंपरी चिंचवडच्या सर्व मुख्य मार्गावर महिलांसाठी स्वच्छतागृहे उभारा

आमदार लक्ष्मण जगताप यांची आयुक्तांना सूचना

५ जानेवारी २०२०,
पिंपरी-चिंचवड शहरात विकासकामांचा डोंगर उभा राहिला असला तरी, संपूर्ण शहरात महिलांसाठी पुरेशी स्वच्छतागृहे उभारण्यात आलेली नाहीत. कामानिमित्त घराबाहेर पडणार्‍या महिलांची कुंचबणा होत आहे. ही बाब आपल्या महापालिकेसाठी भूषणावह नाही. त्याची गंभीर दखल घेऊन शहरातील सर्व मुख्य मार्गांवर महिलांसाठी पुरेशी स्वच्छतागृहे उभारण्याची तातडीने प्रशासकीय कार्यवाही सुरू करावी. त्यासाठी महापालिकेच्या आगामी अर्थसंकल्पात तरतूदही करण्यात यावी, अशी सूचना आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे, पिंपरी-चिंचवड हे शहर विकासाच्यादृष्टीने पुढारलेले शहर बनले आहे. केंद्र व राज्य सरकारकडून मिळालेला निधी तसेच महापालिकेच्या माध्यमातून शहरात अनेक मोठे प्रकल्प उभारण्यात आले. त्यामुळे शहराचा चेहरामोहरा बदललेला आहे. चांगल्या सुख-सुविधा आणि उपलब्ध नोकर्‍या व रोजगारीमुळे शहराची लोकसंख्या वाढली आहे. वाढत्या लोकसंख्येसोबत अनेक समस्या निर्माण होऊ नयेत म्हणून मुलभूत सुविधाही उपलब्ध करून दिल्या जात आहेत. विशेषतः शहरातील नागरिकांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागू नये म्हणून चांगले प्रशस्त रस्त्यांना प्राधान्य देऊन ते अग्रक्रमाने मार्गी लावण्यात आले आहेत.

बीआरटीएस रस्ते, उड्डाणपूल, ग्रेड-सेपरेटर उभारण्यात आले. या सर्व प्रकल्पांमुळे पिंपरी-चिंचवड हे  देशातील एक चांगले विकसित शहर म्हणून ओळखले जात आहे. परंतु, या विकसितपणाला साजेसे एक काम होणे अद्याप बाकी आहे. शहरातील महिलांना जागोजागी स्वच्छतागृह उपलब्ध करून देण्यासाठी ठोस काम होत नसल्याचे चित्र आहे. शहरात पुरेशी स्वच्छतागृहे नसल्यामुळे दैनंदिन जीवनात कामानिमित्त घराबाहेर पडणार्‍या महिलांची कुंचबणा होत आहे. ही बाब पुढारलेल्या पिंपरी-चिंचवडसाठी भूषणावह नाही. त्यामुळे त्याची महापालिका प्रशासनाने गंभीर दखल घेऊन गांभीर्याने पावले टाकण्याची आवश्यकता आहे.

शहरातील महिलांसाठी प्रत्येक प्रमुख मार्गावर स्वच्छतागृह असणे अत्यंत आवश्यक आहे. तसे झाले तर महिलांचे आरोग्य चांगले राहणार आहे. त्यामुळे शहरातील सर्व मुख्य मार्गांवर प्रत्येक दोन किलोमीटर अंतरावर महिलांसाठी स्वच्छतागृह उभारण्यात यावेत. त्याबाबत प्रशासकीय पातळीवर तातडीने कार्यवाही करून महापालिकेच्या आगामी अर्थसंकल्पात पुरेशी तरतूद करण्यात यावी. त्याचप्रमाणे सीएसआर फंडातून स्वच्छतागृह उभारणे शक्य असल्यास अशा पर्यायाचीही अंमलबजावणी करण्यात यावी, अशी सूचना आमदार लक्ष्मण जगताप यांनी केली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments