हिट अँड रन कायद्याविरोधात ट्रान्सपोर्ट युनियनच्यावतीनं संप पुकारण्यात आला आहे. आज या संपाचा दुसरा दिवस आहे. मात्र या राज्यव्यापी संपामध्ये पुणे पेट्रोल डिझेल असोसिएशन सहभागी होणार नाही. पुण्यातील सर्व पेट्रोल पंप चालू राहणार आहेत. पेट्रोल पंप बंद निर्णयावर पेट्रोल डिझेल असोसिएशनचा खुलासा केला आहे. राज्यव्यापी संपामध्ये पुणे पेट्रोल डिझेल असोसिएशन सहभागी होणार नाही.
केंद्र सरकारच्या नव्या वाहन कायद्याला विरोध म्हणून देशभरातील वाहनचालकांनी तीन दिवसांसाठी संप पुकारलेला आहे. राज्यातील अनेक शहरांमध्ये संप पाळण्यात येत असून वाहनचालक आक्रमक झाले होते. मात्र या संपात पुणे पेट्रोल डिझेल असोसिएशन सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे शहरासह पुणे जिल्ह्यातील देखील सर्व पेट्रोल पंप सुरळीत चालू राहणार आहे. पेट्रोल डिझेल असोसिएशनच्या बैठकीत एकत्रितरित्या हा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे शहरात पेट्रोल पंप सुरळीत सुरू राहणार आहे. ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे प्रवक्ते अली दारुवाला यांनी सर्व पेट्रोल पंप सुरु राहतील असं सांगितलं आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील पेट्रोल पंप सुरु राहणार आहेत, असं ते म्हणाले.
ट्रकचालकांच्या संपाचा एसटीवरही परिणाम होण्याची शक्यता
भारत पेट्रोलियम , हिंदुस्थान पेट्रेलियम , इंडियन ऑईल या इंधन कंपन्यांसह इंडियन गॅस बॉटलिंग प्रकल्पातील इंधन वाहतूक करणारे टँकर चालक सहभागी झाले आहेत. त्यामुळे राज्यात इंधन तुटवडा निर्माण होण्याची भीती आहे. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी पेट्रोल पंपावर पेट्रोल, डिझेल भरण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. ट्रक चालकांच्या संपामुळे पेट्रोलची वाहतूक होणार नसल्याने नागरिकांनी वाहनांमध्ये पेट्रोल भरण्यासाठी पंपावर मोठ्या रांगा लावल्या आहेत. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये एसटी महामंडळाकडे दोन दिवस पुरेल एवढाच डिझेलचा पुरवठा शिल्लक आहे. त्यामुळे ट्रकचालकांच्या संपाचा एसटीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
राज्य सरकारचे जिल्हा प्रशासन, पोलिसांना आदेश
राज्यात पेट्रोल तुटवडा होणार असल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर सगळ्याच जिल्ह्यात पेट्रोलपंपावर वाहन चालकांची गर्दी उसळली आहे. राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना शासनाकडून पत्रक जारी करण्यात आले आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश सरकारने दिले आहे. त्याशिवाय, तेल कंपन्यांना आवश्यक सहकार्य करा अशी सूचना देण्यात आली आहे. संपात सहभागी वाहतूकदारांकडून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी काळजी घेण्याच्या सूचना सरकारने प्रशासनाला दिल्या आहेत.