नवी दिल्ली : देशभरातील नागरिकांना महागाईचा आणखी एक मोठा झटका बसला असून, आजपासून (15 मे) पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे. पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 3 रुपयांची, तर डिझेलच्या दरात 3.11 रुपयांची वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, रुपयाचे अवमूल्यन आणि मध्य-पूर्वेतील तणावपूर्ण परिस्थितीमुळे इंधन दरवाढ अपरिहार्य झाल्याचे तेल कंपन्यांनी स्पष्ट केले आहे.
दिल्लीमध्ये नियमित पेट्रोलचा दर 94.77 रुपयांवरून 97.77 रुपये प्रतिलिटर झाला आहे. तर डिझेलचा दर 87.67 रुपयांवरून 90.67 रुपये प्रतिलिटरपर्यंत वाढला आहे. शुक्रवारी सकाळी 6 वाजल्यापासून नवीन दर लागू करण्यात आले.
गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारातील क्रूड ऑइलच्या किमती सातत्याने वाढत असल्याने देशांतर्गत इंधन दर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. इराण-अमेरिका संघर्ष आणि मध्य-पूर्वेतील तणावामुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम झाला असून त्याचा थेट परिणाम आता भारतीय ग्राहकांवर दिसून येत आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी नागरिकांना काटकसरीचे आवाहन केले होते. परकीय चलनाची बचत करण्यासाठी इंधनाचा संयमाने वापर करणे, सोन्याची खरेदी पुढे ढकलणे आणि परदेश प्रवास टाळणे यांसारख्या उपाययोजनांचा त्यांनी उल्लेख केला होता. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्यही घसरले असून, रुपया 95 च्या पातळीखाली गेला आहे.
याच पार्श्वभूमीवर देशातील महागाईचा दरही चिंताजनकरीत्या वाढला आहे. एप्रिल 2016 मध्ये घाऊक महागाई दर (WPI) थेट 8.30 टक्क्यांवर पोहोचला असून, मार्चमध्ये तो 3.88 टक्के होता. अवघ्या एका महिन्यात झालेली ही वाढ गेल्या 42 महिन्यांतील सर्वाधिक वाढ मानली जात आहे.
विशेषतः पेट्रोल, डिझेल, एलपीजी आणि कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये झालेल्या मोठ्या वाढीमुळे ‘फ्यूल आणि पॉवर’ क्षेत्रातील महागाईने विक्रमी झेप घेतली आहे. मार्चमध्ये 1.05 टक्के असलेली या क्षेत्रातील महागाई एप्रिलमध्ये थेट 24.71 टक्क्यांवर पोहोचली आहे.
दरवाढीमुळे वाहतूक, अन्नधान्य, उद्योग आणि दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवर परिणाम होण्याची शक्यता असून, सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर मोठा ताण येणार आहे.


