Tuesday, February 18, 2025
Homeताजी बातमीनिवडणूक आयोगाविरोधात ठाकरे गटाकडून याचिका दाखल… पक्ष नाव आणि चिन्हाचा वाद आता...

निवडणूक आयोगाविरोधात ठाकरे गटाकडून याचिका दाखल… पक्ष नाव आणि चिन्हाचा वाद आता सर्वोच्च न्यायालयात

निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिल्यानंतर ठाकरे गटासमोर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. शिवसेना हे पक्षनाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय आयोगाने दिला. त्यामुळे आता ठाकरे गटासमोर पेच निर्माण झाला असून त्यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेचा निकाल लागेपर्यंत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.

निवडणूक आयोगाने काय निकाल दिला… ?
शिवसेना हे पक्षनाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह कुणाला मिळणार? यासंदर्भात निवडणूक आयोगासमोर प्रदीर्घ सुनावणी झाली होती. त्यानंतर आयोगाने आपला निकाल राखून ठेवला होता. अखेर दोन दिवसांपूर्वी आयोगाने निकाल जाहीर केला आहे. या निकालामध्ये आयोगाने शिवसेना हे पक्षनाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह शिंदे गटाला देण्याचा मोठा निर्णय दिला. त्यामुळे ठाकरे गटासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.

याचिका दाखल करुन घेतली का?
दरम्यान, ठाकरे गटाकडून याचिका दाखल करण्यात आली असली, तरी ती अद्याप सर्वोच्च न्यायालयाकडून दाखल करून घेण्यात आली नसल्याची माहिती समोर येत आहे. आजच्या लिस्टेड मेन्शनिंगमध्ये ठाकरे गटाच्या याचिकेचा समावेश नव्हता. न्यायालयाने यासंदर्भात ठाकरे गटाला उद्या पुन्हा याचिकेसंदर्भात मेन्शनिंग करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानंतर याचिका दाखल करून घ्यायची की नाही? याबाबत न्यायालय निर्णय घेईल, असं सांगितलं जात आहे.

मुख्य याचिकेबरोबरच सुनावणी होणार?
सध्या सर्वोच्च न्यायालयात शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण प्रलंबित आहे. यासंदर्भात सध्या न्यायालयात सुनावणी चालू असून या प्रकरणाबरोबरच आता निवडणूक आयोगाच्या निकालाचं प्रकरणही सुनावणीला घेतलं जाण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाची याचिका दाखल करून घेतल्यास, मुख्य याचिकेबरोबरच या प्रकरणाचीही सुनावणी होऊ शकते.

शिंदे गटाकडून कॅव्हेट दाखल.. !
दरम्यान, ठाकरे गटाकडून याचिका दाखल होण्यापूर्वीच शिंदे गटाकडून या प्रकरणी कॅव्हेट दाखल करण्यात आली होती. त्यामुळे आता ठाकरे गटाची याचिका दाखल करून घेतानाही शिंदे गटाची बाजू न्यायालयाकडून ऐकून घेतली जाईल. त्यामुळे मंगळवारी यासंदर्भात न्यायालयासमोर दोन्ही बाजूंनी युक्तिवाद केला जाण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments