१६ डिसेंबर
एखाद्या सेवेतील अथवा निवृत्त लष्करप्रमुखावर देशद्रोहाचा खटला चालवून त्याला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आल्याची ही पाकिस्तानमधील पहिलीच वेळ आहे. पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पेशावरमधील विशेष न्यायालयाने २००७ मध्ये पाकिस्तानात जारी करण्यात आलेली आणीबाणीच्या खटल्यामध्ये त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. २०१३ पासून सुरु असणाऱ्या या खटल्यामध्ये मुशर्रफ यांना दोषी ठरवण्यात आले आहे. देशात आणीबाणी पुकारणे हा देशद्रोह असून त्याच आरोपाखाली मुशर्रफ यांच्यावर खटला चालविला जावा, अशी मागणी करणारी याचिका येथील त्रिसदस्यीय विशेष न्यायालयात २०१३ साली दाखल करण्यात आली होती. ही याचिका न्यायालयाने ग्राह्य धरत खटला दाखल करुन घेतला होता. मागील सहा वर्षांपासून या प्रकरणामध्ये सुनावणी सुरु होती. अखेर या प्रकरणी आज न्यायलयाने आपला निर्णय सुनावला असून मुशर्रफ यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
मुशर्रफ यांनी २००७ मध्ये पाकिस्तानात आणीबाणी लादली होती, पाकिस्तानी राज्यघटनेच्या सहाव्या कलमामध्ये राज्यघटनेच्या अंमलबजावणीस स्थगिती दिल्यास आजन्म कारावासाची किंवा देहदंडाची तरतूद असतानाही त्यांनी असे केले , या पाश्र्वभूमीवर, पाकिस्तान सरकारने इस्लामाबाद येथील त्रिसदस्यीय विशेष न्यायालयाकडे मुशर्रफ यांच्याविरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका दाखल केली होती. आता या निकालाविरोधात मुशर्रफ वरिष्ठ न्यायलयामध्ये याचिका दाखल करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.