वैध बांधकामावर आकारली जाणारी शास्ती सर्व प्रकारच्या बांधकामांना माफ करण्याचा अध्यादेश शुक्रवारी राज्य सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आला. या निर्णयामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील ९७,६९९ बांधकामांना फायदा होणार असला तरी त्यांच्याकडून मूळ कराचा भरणा केल्यानंतरच त्यांना शास्ती माफ होणार आहे. त्यामुळे मालमत्ताधारकांनी मूळ कर त्वरित भरून शास्ती माफीचे प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून करण्यात आले आहे.
शास्तीमाफीचे प्रमाणपत्र नागरिकांना ऑनलाइन उपलब्ध होणार आहे. संबंधित मालमत्ताधारकांनी मूळ कराचा संपूर्ण भरणा केल्यानंतर लगेचच हे प्रमाणपत्र त्यांना डाउनलोड करता येईल. त्यासाठी कर संकलनाच्या संगणक प्रणालीमध्ये आवश्यक ते बदल करण्यात आलेले आहेत. त्याबरोबरच, शास्तीमाफी अध्यादेसाच्या दिवसापर्यंतच्या अवैध बांधकामांना लागू होणार आहे. ही माफ झालेली शास्ती कायमस्वरूपी आहे. यामध्ये अवैध बांधकामाची शास्ती माफ झाली म्हणजे ते बांधकाम नियमित झाले असे होणार नाही, हेसुद्धा अध्यादेशातून स्पष्ट करण्यात आले आहे. तीन मार्चपर्यंत अस्तित्वात असलेल्या अवैध बांधकामांची नोंद संबंधित मालमत्ताधारकांनी केली नसेल, तर अशा मालमत्ताधारकांच्या बाबतीत काय धोरण असावे याबाबत सरकारकडून मार्गदर्शन मागवले जाणार आहे. मार्गदर्शन प्राप्त झाल्यावर त्यानुसार कार्यवाही केली जाईल, असे कर संकलन विभागाने स्पष्ट केले आहे..
३११ कोटी मूळ कर येणे बाकी
अवैध बांधकामांवरची शास्ती माफ झाल्याने आता एकूण ३११.१७ कोटी रुपये मूळ कर येणे बाकी असून, यामुळे महापालिकेच्या उत्पन्नात वाढ होणार आहे.
कार्यालये सुट्टीच्या दिवशीही सुरू
मूळ कराचा भरणा करण्यासाठी करसंकलन कार्यालये ३१ मार्चपर्यंत साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी आणि कार्यालयीन वेळेनंतरसुद्धा सुरू राहणार आहेत. नागरिकांनी याचा लाभ घेऊन मूळ मिळकतकर त्वरित भरावा, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून करण्यात आले आहे.