Tuesday, October 13, 2026
Homeअर्थविश्वअनधिकृत जाहिरात फलकांवर PCMC ची धडक कारवाई; पुनावळेतील ४०×३० फुटांचा फलक लोखंडी...

अनधिकृत जाहिरात फलकांवर PCMC ची धडक कारवाई; पुनावळेतील ४०×३० फुटांचा फलक लोखंडी स्ट्रक्चरसह हटविला

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीत विनापरवानगी उभारण्यात येणाऱ्या अनधिकृत जाहिरात फलकांवर महापालिकेने कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. या मोहिमेअंतर्गत ताथवडे रोड, विष्णूदेव नगर, पुनावळे येथे अनधिकृतपणे उभारण्यात आलेला ४०×३० फुटांचा जाहिरात फलक लोखंडी स्ट्रक्चरसह निष्कासित करण्यात आला.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील नियम २४४ व २४५ तसेच महाराष्ट्र महानगरपालिका (आकाशचिन्ह व स्कायसाईन) व जाहिरात प्रदर्शित करण्याचे नियमन व नियंत्रण नियम, २०२२ मधील तरतुदीनुसार खासगी जागेतही जाहिरात फलक उभारण्यासाठी महापालिकेची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे.

पिंपरी-चिंचवड हे देशातील प्रमुख औद्योगिक शहर असून शहर स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. त्यामुळे शहराचे सौंदर्य आणि नियोजन अबाधित राखण्याच्या दृष्टीने अनधिकृत जाहिरात फलकांवर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे. विनापरवानगी जाहिरात फलक उभारल्यामुळे शहराचे विद्रुपीकरण होण्यासोबतच महापालिकेच्या महसुलावरही परिणाम होत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

याच पार्श्वभूमीवर आकाशचिन्ह व परवाना विभागामार्फत अनधिकृत जाहिरात फलकांची स्थळ पाहणी करून ते तातडीने निष्कासित करण्याची मोहीम सुरू आहे. यापूर्वी ताथवडे येथील अनधिकृत जाहिरात फलक, थरमॅक्स चौकातील फलक, समर्थ सहकारी बँकेच्या इमारतीवरील फलक तसेच सर्व्हे क्रमांक १७५/९, काळीभित रोड, चोवीसावाडी येथील जाहिरात फलकांवरही कारवाई करण्यात आली आहे.

पुनावळे येथील जाहिरात फलकावर मंगळवार, २२ सप्टेंबर २०२६ रोजी आकाशचिन्ह व परवाना विभागामार्फत कारवाई करण्यात आली. ही कारवाई उपायुक्त (परवाना) राजेश आगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील सर्व जाहिरात एजन्सींनी यापुढे विनापरवानगी जाहिरात फलक उभारू नयेत, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. अनधिकृत जाहिरात फलक आढळून आल्यास तो कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय तात्काळ निष्कासित करण्यात येईल, असा इशाराही महापालिकेने दिला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments