Wednesday, February 11, 2026
Homeताजी बातमीस्वच्छ सर्वेक्षण २०२६ साठी पीसीएमसी सज्ज, शहर स्वच्छतेसाठी सफाई कर्मचाऱ्यांचे अविरत श्रम

स्वच्छ सर्वेक्षण २०२६ साठी पीसीएमसी सज्ज, शहर स्वच्छतेसाठी सफाई कर्मचाऱ्यांचे अविरत श्रम

 स्वच्छ सर्वेक्षण २०२५ स्पर्धेत राज्यात सर्वप्रथम आणि देशात सातवा क्रमांक प्राप्त केलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेने स्वच्छ सर्वेक्षण २०२६ साठी देशात अव्वल क्रमांक मिळविण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. या अनुषंगाने शेकडो सफाई सेवक अत्याधुनिक यंत्रसामग्रीच्या सहाय्याने शहराचे रूप पालटण्याचे काम सध्या अविरतपणणे करीत आहेत.

पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल व सहायक आयुक्त अमित पंडित यांच्या अधिपत्याखाली राबविण्यात येणाऱ्या अहोरात्र स्वच्छता मोहिमेमुळे नागरिकांना धूळमुक्त, स्वच्छ आणि प्रसन्न वातावरण अनुभवायला मिळत आहे.

पिंपरी चिंचवड हे उद्योगनगरी आणि गजबजलेल्या बाजारपेठांचे शहर असल्याने पिंपरी कॅम्प, चिंचवड स्टेशन, भोसरी तसेच हिंजवडी आयटी पार्ककडे जाणारे प्रमुख रस्ते दिवसभर वाहनांनी गजबजलेले असतात. त्यामुळे दिवसा स्वच्छता करणे मोठे आव्हान ठरते. ही अडचण लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने रात्रपाळी स्वच्छता मोहीम अधिक तीव्र केली आहे.

या मोहिमेत मनुष्यबळासोबत आधुनिक यंत्रसामग्रीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. मेकॅनिकल स्वीपिंग मशीनद्वारे मुख्य रस्त्यांवरील बारीक धूळ हटवली जाते. वॉटर स्प्रिंकलर्सच्या साहाय्याने रस्ते व दुभाजक धुऊन हवेतल्या धुळीचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच कचरा वाहतूक यंत्रणा रात्रीच कचरा डेपोपर्यंत पोहोचवत असल्याने स्वच्छतेच्या कामाला गती मिळत आहे.

सर्व कर्मचारी आवश्यक सुरक्षासाहित्य परिधान करून रात्रभर कार्यरत असतात. शहर झोपेत असताना हे ‘स्वच्छता योद्धे’ शहराला नव्या पहाटेची तयारी करून देतात. महापालिका प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांच्या आरोग्य व सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजनाही करण्यात आल्या आहेत.

ओला व सुका कचरा वेगळा द्या

– कचरा विलगीकरण करून घरगुती कचरा हा ओला व सुका असा वेगळा करून घंटागाडीला द्यावा.

– रस्त्यांवर अनधिकृत पार्किंग टाळावे, जेणेकरून साफसफाईत अडथळे येणार नाहीत. – सार्वजनिक ठिकाणे व आपला परिसर स्वच्छ ठेवावा.

पिंपरी चिंचवड शहरात राबविण्यात येणाऱ्या अहोरात्र स्वच्छता मोहिमेमुळे दिवसभर वाहतुकीने गजबजलेल्या प्रमुख रस्त्यांची प्रभावी साफसफाई शक्य होत आहे. आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर आणि सफाई सेवकांचे समर्पित योगदान यामुळे शहराची स्वच्छता पातळी सातत्याने उंचावत आहे. ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२६’ मध्ये उल्लेखनीय स्थान मिळवण्याच्या दृष्टीने महापालिका प्रशासन कटिबद्ध आहे. सफाई सेवकांच्या या प्रयत्नांना बळ देण्यासाठी नागरिकांनी कचरा विलगीकरण करणे व सार्वजनिक स्वच्छता राखणे ही सामूहिक जबाबदारी समजून सक्रिय सहभाग नोंदवावा. — डॉ. प्रदीप ठेंगल, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments