पिंपरी, ता.9: शहरात रूग्णालयाबाहेर दाखल झालेल्या रूग्णांसाठी ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शनची चढ्या दराने विक्री करणाऱ्या शहरातील तीन नामांकित रूग्णालयांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने (पीसीएमसी) आज कारणे दाखवा नोटीस बजावली. आयुक्त राजेश पाटील यांनी यासंदर्भात कारणे दाखवा नोटीस बजावत 48 तासांच्या आत यासंदर्भात खुलासा मागविला आहे.
पीसीएमसी आयुक्त राजेश पाटील यांनी आदित्य बिर्ला हॉस्पिटल व लोकमान्य हॉस्पिटलचे संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आणि डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलचे अधिष्ठाता तथा वैद्यकीय अधीक्षक यांना नोटीस बजावली आहे.

रूग्णालयाबाहेर दाखल झालेल्या रूग्णांसाठी सद्य परिस्थितीत इंजेक्शन अशा पद्धतीने विकल्यामुळे लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. या तीन रुग्णालयांना त्यांचा चौकशी अहवाल 48 तासांत पाठविण्यास सांगितले आहे, असे पीसीएमसीच्या निवेदनात म्हटले आहे. तसेच साथरोग अधिनियम 1897 आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अंतर्गत आपणा विरुद्ध आवश्यक कारवाई का, करू नये असे नोटीसमध्ये म्हटले आहे.
महाराष्ट्र राज्य सरकारने ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शनची 1100 ते 1400 रूपये अशी किंमत निश्चित केली आहे. तरीही काही ठिकाणी अवैधरित्या एका इंजेक्शनसाठी 5000 रुपये द्यावे लागत असल्याचे आरोप रूग्णांच्या नातेवाईकांकडून केला जात आहे.