अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील बलात्कार व हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी व फाशीची शिक्षा झालेला जितेंद्र उर्फ पप्पू शिंदे याने काल येरवडा कारागृहात टॉवेलने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पहाटेच्या सुमारास कारागृह पोलीस गस्तीसाठी गेले असताना हा प्रकार उघडकीस आला आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथे २०१६ मध्ये सामुहिक बलात्कार व हत्या केल्याची संतापजनक घटना घडली होती. या प्रकरणी न्यायालयाने जितेंद्र ऊर्फ पप्पू बाबुलाल शिंदे, संतोष गोरख भवाळ आणि नितीन गोपीनाथ भैलुमे अशा तिघांना फाशीची शिक्षा सुनावली. त्यांना येरवडा कारागृहात ठेवण्यात आले. त्यात येरवडा कारागृहातील बराकीमध्ये शिंदे याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आज सकाळी आढळून आले. सकाळी ६ वाजता बराकी खुल्या केल्या जातात आणि नंतर १० वाजता बंद करण्यात येतात. दरम्यान, सकाळी गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या आत्महत्या केल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी कारागृह अधिक्षकांच्या हे निदर्शनास आणून दिले.
आत्महत्येचा घटनाक्रम काय?
मिळालेल्या माहितीनुसार, येरवडा मध्यवर्ती कारागृहातील देहांत शासन शिक्षा बंदी क्र. सी-१७७४४ जितेंद्र उर्फ पप्पु बाबुलाल शिंदे वय ३२ वर्षे याने आज रोजी सुरक्षा क्र. १ मधील खोली क्र.१४ मध्ये कैदी टॉवेल फाडून कापडी पट्टीच्या सहाय्याने स्वतः गळफास बनवुन, खोलीच्या दरवाजाला वरील लोखंडी पट्टीला बांधून पहाटे अंदाजे ०५.५८ वाजेच्या दरम्यान लटकलेल्या अवस्थेत कर्तव्यावरील रक्षक निलेश प्रकाश कांबळे यांना दिसून आला. बंदी जिवंत असेल या भावनेने त्याचा जीव वाचविण्याकरीता निलेश कांबळे यांनी सुरक्षा २ येथे कर्तव्यावर असलेले त्याचे सहकारी शशीकांत शेंडे (रक्षक) यांना आवाज देऊन मदतीसाठी बोलाविले व बंदी जितेंद्र उर्फ पप्पु बाबुलाल शिंदे याने लोखंडी पट्टीला वरती अडकविलेली टॉवेलची गाठ सोडवून बंदीला खाली उतरविले. त्यानंतर वॉकीटॉकीव्दारे रात्रपाळी ऑर्डरली ऑफिसर ए. पी. यादव, तुरुंगाधिकारी श्रेणी-२ यांना कळविले. यादव, तुरुंगाधिकारी श्रेणी-२ हे तात्काळ सुरक्षा क्र. १ येथे येऊन देहांत शासन बंदी सी-१७७४४ जितेंद्र उर्फ पप्पु बाबुलाल शिंदे याने आत्महत्या केल्याचे दिसुन आले असता, त्यांनी तातडीने कारागृह वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय मरसाळे यांना कारागृह रुग्णालय येथुन सुरक्षा १ येथे वॉकीटॉकीव्दारे बोलावून घेतले.

त्यानंतर कारागृह वैद्यकीय अधिकारी डॉ. मरसाळे हे तात्काळ सुरक्षा विभाग क्र. १ येथे आले आणि बंदयाची तपासणी करुन सकाळी ०६.१३ वाजता बंदी जितेंद्र उर्फ पप्पु बाबुलाल शिंदे मयत झाल्याचे घोषीत केले आहे. आरोपीच्या मानसिक आजारावर कारागृह मनोरुग्ण तज्ञ यांचे सल्ल्याने नियमित औषधोपचार चालु होते. आरोपीच्या मृत्युप्रकरणी येरवडा पोलीस ठाणे यांचे अंतर्गत पंचनामा करण्यात आला असून शवविच्छेदनाकरिता पुढील कार्यवाहीसाठी आरोपीचा मृतदेह ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे येथे पाठविण्यात आला आहे. तसेच याबाबत आरोपीच्या नातेवाईकांना कळविण्यात आलेले आहे. या मृत्यू प्रकरणाची न्यायदंडाधिकारी चौकशी होणेबाबत, मुख्य न्यायदंडाधिकारी, पुणे यांना विनंती करण्यात आलेली आहे.