पीटीआयः
पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातील सरकारने येथील हिंदू मंदिराच्या पुनर्बांधकामासाठी 3 कोटी 48 लाख रुपये देण्याचे ठरवले आहे. तसे आदेश शुक्रवारी काढण्यात आले.
प्रांतीय सरकार मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी 3 कोटी 48 लाख 29 हजार रुपये औकाफ विभागाकडे देणार आहे. या पैशातून जमावाने उद्ध्वस्त केलेल्या श्री परमहंसजी महाराज यांच्या समाधीचे बांधकाम केले जाणार आहे.
खैबर पख्तुनख्वा प्रांतातील करक जिल्ह्यातील टेरी नावाच्या गावात हे मंदिर आहे. हे मंदिर 1919 मध्ये बांधले गेले होते. गेल्या वर्षी 30 डिसेंबर रोजी येथील स्थानिक धार्मिक नेते आणि जमियत उलेमा ए इस्लाम या संघटनेच्या नेतृत्वाखाली जमावाने या मंदिरात तोडफोड आणि जाळपोळ केली होती. मानवाधिकार कार्यकर्त्यांनी तसेच अल्पसंख्याक हिंदू नेत्यांनी या घटनेचा निषेध नोंदवून सर्वोच्च न्यायालयाला या मंदिराच्या पुनर्बांधणीचे आदेश देण्यासाठी पाठपुरावा केला होता. त्यानंतर कोर्टाने स्थानिक सरकारला मंदिराच्या बांधकामाचे निर्देश दिले होते. गेल्या महिन्यात, स्थानिक मौलवी आणि हिंदू अल्पसंख्य समूहाच्या सदस्यांनी या मंदिराबाबतचा वाद मिटविण्यासाठी बैठक घेतली होती. त्यावेळी हिंदू समुदायाने हे कृत्य करणार्या जमावाला माफ केले होते.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानेही या घटनेचा निषेध नोंदवत दिल्लीतील पाकच्या उच्चायोगाकडे हिंदू समुदायाबाबत काळजी व्यक्त केली होती.