Tuesday, March 18, 2025
Homeताजी बातमीपद्मश्री हा गुरुकुलम मधील प्रत्येकाचा आनंद….पद्मश्री गिरीश प्रभुणे मसाप तर्फे सत्कार आणि...

पद्मश्री हा गुरुकुलम मधील प्रत्येकाचा आनंद….पद्मश्री गिरीश प्रभुणे मसाप तर्फे सत्कार आणि प्रकट मुलाखत

भटक्या विमुक्त जाती जमातींना, न्याय मिळवून देण्यासाठी, मी आयुष्यभर शासनाची संघर्ष केला.पण शासनानेच माझा सन्मान केल्यामुळे, भटक्या-विमुक्तांच्या समस्यांची जाणीव शासनाला झाली आहे. असे मला वाटते तसेच पद्मश्री हा माझ्या एकट्याला झालेला आनंद नसून तो गुरुकुलम मधील प्रत्येकाचा आनंद आहे असे मत ज्येष्ठ साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी व्यक्त केले. निमित्त होते मसाप आयोजित त्यांच्या प्रकट मुलाखतीचे

महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी-चिंचवडच्या वतीने, प्रभुणे यांना पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाल्याप्रित्यर्थ, त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच त्यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष राजन लाखे, कार्याध्यक्ष विनीता ऐनापुरे, उपाध्यक्षा डॉ. रजनी शेठ कोषाध्यक्ष विजय नाईक, श्रीकांत चौगुले, अरुण बोऱ्हाडे, संजय पवार, संदीप राक्षे आदि उपस्थित होते . सत्कारानंतर त्यांची प्रकट मुलाखत झाली. राजन लाखे व श्रीकांत चौगुले यांनी प्रभुणे ची मुलाखत घेतली.

मुलाखतीत त्यांनी आपल्या लेखन व सामाजिक कार्याचा जीवनपटच उलगडला. ते म्हणाले चिंचवडमध्ये आल्यानंतर असिधारा हे साप्ताहिक सुरू केले. वैचारिक साप्ताहिक चालवणे अवघड असते, त्यामुळे कर्जबाजारी झालो. आर्थिक अडचणीला तोंड देत असतानाच ,माणूस साप्ताहिकात काम करण्याची संधी मिळाली. श्री. ग. माजगावकर यांच्यामुळे “ग्रामायण” प्रकल्पात काम करता आले. अनेक जाती जमातींशी संबंध आला. त्यातून भटक्या-विमुक्तांच्या कार्यास सुरुवात झाली. सोलापूर एसटी स्टँडवर सुरू केलेल्या उघड्यावरच्या शाळेपासून ते आज चिंचवड येथील कौशल्यावर आधारित शिक्षण देणाऱ्या, गुरुकुलम् पर्यंतचा प्रवास त्यांनी उलगडला.

लेखनाविषयीच्या प्रश्नावर ते म्हणाले, अनुभवावर आधारित लेखन करीत गेलो. त्याची पुस्तके झाली. उमेदीच्या काळात खूप कविता लिहिल्या. सामाजिक समरसतेसाठी जातीपातीच्या भिंती बाजूला करून, अनेक जाती जमातीत मिसळून राहिलो. संगीतकार वसंत पवार यांनी बुद्धवंदना शिकवली. त्याचा मुलांवर संस्कार करण्यासाठी उपयोग केला.

मुलाखतीच्या समारोप प्रसंगी ते म्हणाले आपण खूप सुरक्षित वातावरणात राहतो पालावरचं उघड्यावरच सुरक्षित जीवन जगणाऱ्या भटक्या-विमुक्तांना कडे संवेदनशीलतेने पाहिले पाहिजे .त्यांना मुख्यप्रवाहात आणण्यासाठी सर्वांनी मदत करण्याचे त्यांनी आवाहन केले.

या प्रसंगी बालदिनाच्या निमित्ताने, साहित्य परिषदेच्या वतीने गुरुकुलमधील मुलांना, अपर्णा मोहिले, प्रतिभा कुलकर्णी यांच्या हस्ते पुस्तके भेट देण्यात आली.
श्रीकांत जोशी माधुरी मंगरुळकर, सीमा गांधी, किशोर पाटील, दत्तू ठोकळे, राधाकृष्ण कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
संजय जगताप यांनी सूत्रसंचालन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments