“लोकसहभाग हीच शहर विकासाची खरी ताकद आहे,” असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी निगडी प्राधिकरण येथील ऑक्सिजन पार्कच्या उद्घाटनप्रसंगी केले. स्थानिक नागरिक आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त प्रयत्नातून साकारलेला हा पर्यावरणपूरक उपक्रम शहरासाठी एक आदर्श ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.
निगडी प्राधिकरण सेक्टर २६ येथे विकसित करण्यात आलेल्या या ऑक्सिजन पार्कचे उद्घाटन हजारो नागरिकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत पार पडले. या कार्यक्रमास आमदार अमित गोरखे, उपमहापौर शर्मिला बाबर, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, नगरसदस्या शैलजा मोरे, अनुराधा गोरखे, नगरसदस्य अमित गावडे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महापौर लांडगे पुढे म्हणाले की, “पर्यावरण संवर्धन ही केवळ प्रशासनाची नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. अशा हरित उपक्रमांमुळे शहर अधिक आरोग्यदायी, सुंदर आणि पर्यावरणपूरक बनणार आहे.” शहरातील २०३ उद्यानांपैकी २५ ते ३० उद्यानांमध्ये लोकसहभागातून अशा प्रकारचे प्रकल्प राबविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच उपस्थित नागरिकांनी ‘माझी वसुंधरा’ शपथ घेऊन पर्यावरण रक्षणाचा निर्धार व्यक्त केला. “जास्तीत जास्त झाडे लावून वसुंधरा स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त ठेवण्याचा प्रयत्न करू,” अशी प्रतिज्ञा नागरिकांनी घेतली. शपथेचे वाचन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.
उपमहापौर शर्मिला बाबर म्हणाल्या की, “शहरातील प्रत्येक प्रभागात हरित क्षेत्र वाढवण्यासाठी प्रशासन आणि नागरिक एकत्र येत आहेत. लोकसहभागातून साकारलेले ऑक्सिजन पार्क हे भावी पिढ्यांसाठी मौल्यवान ठेवा आहे.”
तर आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी नमूद केले की, “वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर हरित क्षेत्रांचे जतन आणि संवर्धन अत्यंत गरजेचे आहे. नागरिकांच्या सहभागातून साकारलेला हा प्रकल्प पर्यावरण संतुलन राखण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल.”
निगडीतील हा ऑक्सिजन पार्क केवळ एक उद्यान नसून, लोकसहभागातून उभ्या राहणाऱ्या हरित शहराच्या संकल्पनेचा एक प्रभावी नमुना ठरत आहे.


