राज्यात अनेक भागांत डोळे येण्याची साथ मोठ्या प्रमाणात सुरू आहे. राज्यभरात ३ ऑगस्टपर्यंत १ लाख ८७ हजार रुग्ण आढळले आहेत.
राज्यात अनेक भागांत डोळे येण्याची साथ मोठ्या प्रमाणात सुरू आहे. राज्यभरात ३ ऑगस्टपर्यंत १ लाख ८७ हजार रुग्ण आढळले आहेत. सर्वाधिक रुग्णंसख्या बुलढाण्यात असून, त्यानंतर जळगाव, अमरावती आणि पुण्यात प्रमाण जास्त आहे. डोळे येण्याची साथ वाढल्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून जास्त रुग्णंसख्या आढळलेल्या भागात सर्वेक्षण करून उपाययोजना केल्या जात आहेत.
डोळे येण्याचे सर्वाधिक ३० हजार ५९२ रुग्ण बुलढाणा जिल्ह्यात आढळले आहेत. त्याखालोखाल जळगाव जिल्ह्यामध्ये १२ हजार १३९, अमरावती १० हजार ७१०, पुणे १० हजार ५३१ आणि अकोला १० हजार १३२ अशी रुग्णसंख्या आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत ३ हजार ५५१ रुग्ण सापडले असून, पुणे महापालिका हद्दीत १ हजार १९५ रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईतील रुग्णसंख्या १ हजार ३१७ आहे.
मागील महिन्यात पुणे जिल्ह्यातील आळंदी परिसरात डोळ्याच्या साथीचे चार हजारांहून अधिक रुग्ण आढळले होते. यानंतर जिल्हा परिषदेने त्या परिसरातील शाळांमध्ये मुलांच्या तपासणीची मोहीम हाती घेतली होती. आळंदी परिसरातून राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेने (एनआयव्ही) रुग्णांचे नमुने गोळा केले होते. त्यांची तपासणी करून आरोग्य विभागाकडे अहवाल सादर करण्यात आला होता. या अहवालात एंटेरो विषाणूमुळे ही साथ पसरल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता.
डोळे येण्याची लक्षणे
डोळे लाल होणे
वारंवार पाणी येणे
डोळ्याला सूज येणे
अशी घ्या काळजी…
वैयक्तिक स्वच्छता ठेवणे
वारंवार हात धुणे
डोळ्यांना हात न लावणे
डोळे आलेल्या व्यक्तीचे घरातच विलगीकरण
परिसर स्वच्छता ठेवून माशा, चिलटांचे प्रमाण कमी करणे
डोळे येण्याची साथ सुरू असलेल्या भागात आरोग्य कर्मचाऱ्यांकडून घरोघरी सर्वेक्षण केले जात आहे. याचबरोबर त्या भागातील शाळांमध्ये मुलांची तपासणीही केली जात आहे. या साथीवरील उपचारासाठी आवश्यक असलेली औषधे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. -डॉ. प्रतापसिंह सारणीकर, सहसंचालक, आरोग्यसेवा