Saturday, March 22, 2025
Homeताजी बातमीआपलेच मराठी मंत्री दिल्लीत बसून महाराष्ट्राची बदनामी करत आहेत; संजय राऊतांची जोरदार...

आपलेच मराठी मंत्री दिल्लीत बसून महाराष्ट्राची बदनामी करत आहेत; संजय राऊतांची जोरदार टीका

महाराष्ट्रात लसींचा तुटवडा भासत असून, या पार्श्वभूमीवर राज्य सरकार व केंद्र सरकारमध्ये सध्या आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. “एक काळ असा होता दिल्लीतील आपले जे मराठी मंत्री, नेते होते. ते कोणत्याही पक्षाचे असो, पण महाराष्ट्राचा जर विषय आला की हे सगळी लोकं एकत्र यायचे आणि केंद्रात महाराष्ट्राच्या हक्कासाठी लढत राहिले आहेत. हे मी स्वतः पाहिलेलं आहे. पण आता चित्र नेमकं उलटं आहे. आता सत्तेतील जे आपले मराठी मंत्री आहेत, ते तिथे बसून महाराष्ट्राची बदनामी करत आहेत. जगाच्या इतिहासात असं मी कधी पाहिलं नव्हतं, की आपल्याच राज्याची बदनामी दिल्लीच्या सरकारमध्ये बसून करायची. हे कोणतं राजकारण सुरू आहे?” असा सवाल शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे. एबीपी माझाशी बोलतान संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी व केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.

संजय राऊत म्हणाले, “लस ही माणसाला या क्षणी जीवनावश्यक गोष्ट आहे. एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणातात, लस उत्सव साजरा करा. जागृती होण्यासाठी आणि महाराष्ट्रात लसीचा तुटवडा आहे, का? तर इथे भाजपाचं राज्य नाही. इथे शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. याला अमानुष राजकारण म्हणतात. उत्तर प्रदेश, बिहारसह अन्य राज्यांमध्ये गरजेपेक्षा जास्त लसीचा पुरवठा केला गेला आहे. गुजरातमध्ये तर करोनाची परिस्थिती इतकी गंभीर आहे की, न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत की महाराष्ट्र मॉडेल राबवा. महाराष्ट्रापेक्षा लोकसंख्या कमी असूनही त्यांना १ कोटी लसी देण्यात आल्या आहेत आणि महाराष्ट्राला आठवड्याला ४० लाख लसींची आवश्यकता असताना, आठ लाख लसींचाही पुरवठा केला जात नाही. महाराष्ट्राच्या तोंडाला केवळ पानं पुसली जात आहेत.”

“आम्हाला यामध्ये राजकारण आणायचं नाही, तुम्ही आणू नका. भाजपाचे जे आमचे सहकारी आहेत, ते कालपर्यंत इथले राज्यकर्ते होते. त्यांचे देखील १०५ आमदार या राज्यातील जनतेने निवडून दिले आहेत, याचं भान त्यांनी ठेवायला हवं. किमान त्यांच्यासाठी तरी त्यांनी लस घेऊन यायला हवी, आमचं आम्ही बघू. महाराष्ट्र तुमचा देखील आहे जेवढा आमचा आहे. महाराष्ट्र म्हणजे कोणत्याही एका राजकीय पक्षाची मक्तेदारी नाही.” असं देखील राऊत यांनी बोलून दाखवलं.

“जे टीका करत आहेत, त्यांनी आपलं रक्त मराठी माणसाचं आहे की नाही हे तपासावं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचं रक्त तुमच्या धमन्यांमध्ये असेल, तर तुम्ही असं एकमेकांवर टीका करणार नाही. राजकीय मतभेद असू शकतात, पण आज संकट आहे.” असं संजय राऊत विरोधकांना म्हणाले.

याचबरोबर “मुंबईत ५१ लसीकरण केंद्र बंद पडली. अनेक ठिकाणी दोन दिवस पुरेल एवढा लसीचा साठा आहे. हे चित्र भयावहं आहे. लोकं रांगेत उभे आहेत. अगोदर तुम्ही नोटाबंदीसाठी लोकांना रांगेत मारलं. आता लसीसाठी रांगेत मारता आहात. हा काय प्रकार सुरू आहे? याचा अर्थ केंद्र सरकारचं नियोजन चुकलं आहे. तुम्ही राज्याला दोष देऊ नका. कोरोनाविरोधातील जी लढाई आहे, ही आमची व्यक्तीगत लढाई नाही. आम्ही केंद्राच्या नेतृत्वात लढाई लढत आहोत. महाराष्ट्रातील जनता ही मोदींची जनता नाही का? आम्ही म्हणतो आहे. ते आमचे पंतप्रधान आहेत, आम्ही त्यांचा आदर करतो. त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. याचा अर्थ असा की संपूर्ण राष्ट्राला त्यांनी संबोधन करावं. आम्ही त्यांचे शब्द मान्य करतो. पण इकडे जे विरोधी पक्षाचे आमचे सहकारी आहे. त्यांनी थोडं संयामाने वागायला हवं. लसींच्याबाबतीत त्यांनी अंगावर येऊन बोलू नये.” असंही राऊत यांनी यावेळी बोलून दाखवलं.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments