Friday, June 21, 2024
Homeराजकारणओटीटी आले, तरी चित्रपट महोत्सवांचे महत्त्व कायम,महोत्सवांच्या भवितव्यावर ‘पिफ’मध्ये परिसंवाद

ओटीटी आले, तरी चित्रपट महोत्सवांचे महत्त्व कायम,महोत्सवांच्या भवितव्यावर ‘पिफ’मध्ये परिसंवाद

ओटीटी वाहिन्या आल्या तरी चित्रपट महोत्सवांचे महत्त्व कायम राहणार आहे, असे मत आज परिसंवादामध्ये व्यक्त करण्यात आले. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (पिफ) ‘चित्रपट महोत्सवांचे भविष्य आणि महत्त्व’, या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. 

राष्ट्रीय पुरस्कार समीक्षक आणि पुद्दूचेरी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे संचालक सैबल चॅटर्जी, बेंगलूरू आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे कला संचालक विजय शंकर, ‘पिफ’च्या चित्रपट निवड समितीचे सदस्य आणि फ्रेंच चित्रपटाचे अभ्यासक अभिजीत रणदिवे, टॅलीन ब्लॅक नाईट्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे कार्यक्रम संचालक एडविनास पुकास्ता यावेळी उपस्थित होते. महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी या संगळ्यांशी संवाद साधला.          

सैबल म्हणाले, “चित्रपट महोत्सवात येणारे चित्रपट हे सहज दिसणारे नसतात. ते सहजपणे कोणत्याही ओटीटी वाहिनीवर उपलब्ध होतातच असे नाही. त्यामुळे महोत्सव महत्त्वाचेच असतात. याचा चित्रपट महोत्सवांनीही विचार करून त्या पद्धतीचे चित्रपट महोत्सवात आणले पाहीजेत. अर्थात हे आव्हान आहे ,पण जगभरातील चित्रपट महोत्सव याचा विचार करून आपापले प्रेक्षक पाहून चित्रपट आणतात.” ते म्हणाले, की चित्रपट महोत्सवात लोक एकत्र येतात आणि चित्रपटांवर विचार करतात. सिनेमा म्हणजे, केवळ थिएटर, साहित्य किंवा केवळ सिनेमा नाही. हे खूप व्यापक माध्यम आहे. त्याचा प्रत्यय महोत्सवात येतो.   

विजय शंकर म्हणाले, “पूर्वीचे फिल्म सोसायटीचे लोक हे, आता चित्रपट महोत्सवाकडे वळले आहेत.  चित्रपट महोत्सवामध्ये चित्रपटांची निवड (क्यूरेटिंग) केली जाते. ही निवड महत्त्वाची असते. कोणत्याही चित्रपट महोत्सवात चित्रपट दिग्दर्शकाची कीर्ती, कार्यक्रम संचालकाचे मत, नेटवर्क आणि आपापले स्थानिक संदर्भ घेऊन चित्रपटांची महोत्सवांमध्ये निवड केली जाते, त्यामुळे महोत्सव महत्त्वाचे असतात.” ते म्हणाले, आता तांत्रिकदृष्ट्या महोत्सव बदलत आहेत. अनेक देश एकत्र येऊन चित्रपट तयार करतात, हे केवळ आपल्याला महोत्सवामध्ये समजते. महोत्सवात अनेक छोट्या भाषांमधील चित्रपट पाहायला मिळतात. महोत्सव ही बौद्धिक आणि सांस्कृतीक गोष्ट आहे, त्यामुळे महोत्सव हे महत्त्वाचे असून, ते सुरू राहतील.  

पुकास्ता म्हणाले, “छोट्या छोट्या देशांचे चित्रपट इतर कोणत्याही ठिकाणी पाहायला मिळत नाहीत. ते ओटीटीवरही पाहायला मिळत नाही. अनेक महत्त्वाच्या लोकांचे चित्रपट हे चित्रपटगुहांमध्येही पाहायला मिळत नाहीत. त्यामुळे महोत्सवात असे चित्रपट पाहायला मिळतात. चित्रपट महोत्सवतून नव्या प्रतिभेची माणसे येतात. चित्रपट दाखवल्यानंतर प्रश्नोत्तरे होतात, लोक दिग्दर्शकाला प्रत्यक्ष भेटतात. त्यामुळे महोत्सव महत्त्वाचे असतात.” 

अभिजीत रणदिवे म्हणाले, “चित्रपट माझ्यासाठी काय आहे, हे समजण्यासाठी चित्रपट महोत्सवांचा उपयोग होतो. भारतामध्ये विविध प्रादेशिक भागांमधील चित्रपट पाहण्यासाठी महोत्सवांचा उपयोग होतो. अनेक मराठी चित्रपटांना निर्माते मिळत नाहीत. ते प्रदर्शीत होतील की नाही, याचीही शंका असते. असे चित्रपट महोत्सवांमध्ये पहायला मिळतात.”

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments