पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा ४१ वा वर्धापन दिन ११ ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येणार असून यानिमित्ताने महापालिकेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणामध्ये नगरीचे शिल्पकार दिवंगत अण्णासाहेब मगर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते सकाळी १० वाजता पुष्पहार अर्पण करून विविध कार्यक्रमांस सुरूवात करण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी १० वाजून १० मिनीटांनी महापालिकेच्या पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणामध्ये रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त कर्मचाऱ्यांसाठी संगीत खुर्ची, रस्सी खेच अशा विविध स्पर्धांचे आयोजन देखील करण्यात आले आहे.
सकाळी ११ वाजता न्यू होम मिनिस्टर अर्थात खेळ पैठणीचा हा खास महिलां कर्मचा-यांसाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. महापालिका कर्मचाऱ्यांसाठी माझी माती माझा देश, मेरा भारत महान तसेच ठिपक्यांची रांगोळी या विषयावर रांगोळी स्पर्धा, गोड व तिखट पदार्थांची पाककला स्पर्धा, फॅन्सी ड्रेस अर्थात वेशभूषा स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे.
२०२२-२३ या वर्षातील उत्कृष्ट काम करणारे अधिकारी, कर्मचारी तसेच रांगोळी, पाककला व वेशभूषा स्पर्धेतील विजेत्यांचा आयुक्त शेखर सिंह यांचे हस्ते सत्कार समारंभही दुपारी ३ वाजता प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमास लोकप्रतिनिधी, माजी नगरसदस्य, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.
महापालिकेतील अधिकारी कर्मचारी गीतगायन कार्यक्रमात सहभागी होणार असून त्यानंतर ऑर्केस्ट्रा सादर होणार आहे अशी माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.