औद्योगिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवड शहराने विकासाच्या दिशेने झेप घेतली आहे. ‘कटिबद्धा जनहिताय’ हे ब्रीदवाक्य सार्थ करणाऱ्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा ४० वा स्थापना दिवस साजरा होत आहे. या वर्धापन दिनानिमित्त महापालिकेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवार, दि. ११ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी १० वाजता पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणामध्ये नगरीचे शिल्पकार दिवंगत अण्णासाहेब मगर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती असणार आहे. खासदार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे, डॉ. अमोल कोल्हे, सुप्रिया सुळे, आमदार लक्ष्मण जगताप, संग्राम थोपटे, अण्णा बनसोडे, महेश लांडगे, उमा खापरे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडणार आहेत.
सकाळी दहा वाजता महापालिकेच्या पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणामध्ये मानवतेसाठी महान दान असणारे रक्तदान शिबीर आयोजित केले आहे. तसेच न्यू होम मिनिस्टर अर्थात खेळ पैठणीचा हा खास महिलांसाठी कार्यक्रम आयोजित केला आहे. संगीत खुर्ची, रस्सी खेच अशा स्पर्धा देखील यावेळी घेतल्या जाणार आहेत. दुपारी १२ वाजता चिंचवड येथील प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहामध्ये महापालिका कर्मचा-यांसाठी आरोग्य विषयक मार्गदर्शन आयोजित केले आहे. “चला निरोगी जगूया ” या विषयावर आयुर्वेद तज्ञ डॉ. शिवरत्न शेटे मार्गदर्शन करणार आहेत. उत्कृष्ट काम करणारे अधिकारी, कर्मचारी तसेच स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार समारंभ दुपारी १ वाजता पार पडणार आहे. त्यांनंतर दुपारी २ वाजता महापालिकेतील अधिकारी कर्मचारी ऑर्केस्ट्रा सादर करणार आहेत, अशी माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.