Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रपर्यावरण संवर्धन योगदानासाठी मोशी येथे हाउसिंग सोसायट्यांच्या मेळाव्याचे आयोजन

पर्यावरण संवर्धन योगदानासाठी मोशी येथे हाउसिंग सोसायट्यांच्या मेळाव्याचे आयोजन

डी. आर. गव्हाणे डेस्टिनेशन्स आणि रोटरी ग्रीन यांचा संयुक्त उपक्रम

डी. आर. गव्हाणे डेस्टिनेशन्स आणि रोटरी ग्रीन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण संवर्धनासाठी आणि पर्यायाने ग्लोबल वॉर्मिंगचे संकट टाळण्यासाठी हाऊसिंग सोसायट्यांसाठी जनजागृतीपर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. पाणी, वीज यांचा काटकसरीने वापर करतानाच आर्थिक बचतीबाबत नागरिकांना सजग करण्यासाठी रविवार दि. 29 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 09.30 ते 12 या वेळेत भारत माता चौक, मोशी येथील जय गणेश बॅंक्वेट अॅंड लॉन्स याठिकाणी हा मेळावा आयोजित केल्याची माहिती पिंपरी- चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी निवेदनाद्वारे दिली आहे.

या मेळाव्याचे उदघाट्न पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंग यांच्या हस्ते होणार असून यावेळी रोटरी क्लबच्या जिल्हा अध्यक्षा मंजू फडके तसेच पिंपरी- चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांची प्रमुख उपस्थिती असेल.

भारतासह संपूर्ण जग सध्या पर्यावरणाच्या अनेक समस्यांना तोंड देत आहे. ग्लोबल वॉर्मिंगमध्ये होणारी वाढ, हरितगृह वायूंची वाढ यामुळे जगासमोर मोठे संकट निर्माण होत आहे. भविष्यात आपल्याला वीज, पाणी यासारख्या अत्यंत मूलभूत गोष्टींच्या टंचाईला मोठ्या प्रमाणावर सामोरे जावे लागू शकते. पर्यावरणासाठी योगदान देण्याचे काम प्रत्येक जबाबदार नागरिकाने आपापल्या स्तरावर केले पाहिजे. यामुळेच डी. आर. गव्हाणे डेस्टिनेशन्स आणि रोटरी ग्रीन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

सेतू प्रकल्पांतर्गत आपल्या सोसायट्यांमध्ये कमी खर्चात पर्यावरणपूरक गोष्टी कशा राबवता येतील यावर या मेळाव्यात चर्चा होणार आहे. तसेच काही प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून प्रामुख्याने पाणी बचत, ऊर्जा बचत तसेच सोसायट्यातील कचऱ्याचे विघटन आणि विल्हेवाट यासारख्या महत्त्वपूर्ण गोष्टींबाबत प्रस्ताव आणि सादरीकरण केले जाणार आहे.

सोसायट्यांकडून होणारा खर्च कमी करण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम महत्त्वाचा आहे. ऊर्जेशी संबंधित अनेक बाबींवर होणारा खर्च आपण वाचवू शकू. तसेच सध्या शहरातील कचऱ्याची विल्हेवाट या प्रश्नाने उग्ररूप धारण केले असून सोसायट्यांमध्येच कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी काही उपाययोजना करता येऊ शकतील का, यावरही चर्चा होणार आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि ग्लोबल वॉर्मिंगमुळे भविष्यातील पाणी टंचाई टाळण्यासाठी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन आपल्यासमोर आहे. यासाठी पर्यावरणाला हातभार लावणाऱ्या गोष्टी आपल्या समाजात राबविण्यासाठी सोसायटीधारकांची उपस्थिती आणि सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा ठरेल. या निमित्ताने सोसायट्यांना पाणी, वीज आणि पर्यायाने आर्थिक बचतीची सवय लागेल, असा विश्वास अजित गव्हाणे यांनी व्यक्त केला.

‘हरित पद्धती खर्च-प्रभावी मार्गांनी लागू करणे’ हा या मेळाव्याचा मुख्य विषय आहे. पर्यावरण अबाधित राखण्याचे महत्त्व जाणून जास्तीत जास्त सोसायट्यांनी या जनजागृतीपर मेळाव्यात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन अजित गव्हाणे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments