भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या ७७ व्या वर्धापन दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात दि. १५ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ८ वाजून १५ मिनिटांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण समारंभ संपन्न होणार आहे. नागरिकांनी या ध्वजारोहण समारंभास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात होणाऱ्या या मुख्य राष्ट्रध्वजारोहण कार्यक्रमास शहरातील लोकप्रतिनिधी, माजी नगरसदस्य, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक आणि महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. आगामी विधानसभा २०२४ च्या अनुषंगाने ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर उपस्थितांना मतदानाची शपथ देण्यात येणार आहे. तसेच मतदान जनजागृतीपर विशेष उपक्रमाचे देखील आयोजन करण्यात येणार आहे. महापालिकेच्या अधिकृत फेसबुक पेज आणि यू ट्यूब चॅनेल वरून या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.
महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या हस्ते, प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये मुख्याध्यापकांच्या हस्ते, औद्योगिक प्रशिक्षण विभागामध्ये संस्थेचे प्राचार्य तर विभागीय कार्यालयांमध्ये संबंधित शाखाप्रमुख यांच्या हस्ते गुरुवार दि. १५ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ७.३० वाजता ध्वजारोहण समारंभ संपन्न होणार आहे.
देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत आपले योगदान देणा-या स्वातंत्र्यवीरांची देशभक्ती, त्याग आणि समर्पण कार्याचा जागर करण्यासाठी तसेच देशवासीयांच्या मनात देशभक्तीची दिव्यज्योत तेवत ठेवण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त गुरुवार दि. १५ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ९. ३० वाजता निगडी येथील भक्ती शक्ती चौकात “झंडा उंचा रहे हमारा” हा देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून क्रांतिकारकांना देशभक्तीपर गीतांतून अभिवादन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन देखील महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.