संदल उरुसावेळी पुण्यातील लोहगडावर होणारा संभाव्य संघर्ष टाळण्यासाठी पोलिसांनी ५ जानेवारी ते ८ जानेवारी या काळात या परिसरात जमावबंदीचा आदेश लागू केला आहे. पुणे जिल्ह्यातील लोहगड किल्ला हे एक ऐतिहासिक महत्त्व असलेले स्थळ आहे. हे ठिकाण दिनांक २६ मे १९०९ मध्ये राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आलेले असून भारतीय पुरातत्त्व विभागाकडे यांच्या अधिपत्याखाली आहे. लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील लोहगड किल्ल्यावरील हाजी हजरत उमरशावाली बाबा यांचा संदल उरूस सुरू होत आहे. या उरुसाला शिवप्रेमी व हिंदुत्ववादी संघटनेचा विरोध आहे.
या कारणास्तव भारतीय पुरातत्त्व विभागाकडून या ठिकाणी कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरता पोलीस बंदोबस्ताची मागणी करण्यात आलेली आहे. लोहगड किल्ला परिसरात कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून प्रांताधिकारी मावळ यांच्याकडून फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये जमावबंदीचे आदेश पारित करण्यात आलेले आहेत.
६ जानेवारीच्या लोहगड किल्ल्यावरील हाजी हजरत उमरशावली बाबा दर्ग्याच्या उरुसाच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने लोहगड व घेरेवाडी परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी ५ जानेवारी ते ८ जानेवारी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत जमावबंदी राहणार आहे. लोहगड परिसरात या दृष्टीने पोलीस अधीक्षक कार्यालय पुणे ग्रामीण यांच्याकडून योग्य तो पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. जमावबंदी दरम्यान आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्याचे संकेत पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिले आहेत.
काय दिलेत आदेश ?
कोणतीही व्यक्ती इंस्टाग्राम, व्हाट्सअप, ट्विटर, फेसबुक आणि इतर समाज माध्यमांद्वारे अफवा, जातीय द्वेष पसरवणारे संदेश खोटी माहिती पोस्ट करणार नाही किंवा फॉरवर्ड करणार नाही. असे केल्यास त्याबाबतची जबाबदारी संबंधित पोस्ट करणारी व्यक्ती तसेच ग्रुप ॲडमिनची राहील.
लोहगड व घेरेवाडी हद्दीमधील गावांमध्ये स्थानिक प्रशासन व पोलीस विभागाच्या लेखी परवानगीशिवाय सार्वजनिक ठिकाणी बॅनर, फ्लेक्स, होर्डिंग लावण्यास प्रतिबंध राहील.