राजस्थानातून अफू विक्रीसाठी आलेल्या तस्कराला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली.
राजस्थानातून अफू विक्रीसाठी आलेल्या तस्कराला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. तस्कराकडून एक कोटी १० लाख ३८ हजार रुपयांची पाच किलो अफू जप्त करण्यात आली. लोहगाव भागात ही कारवाई करण्यात आली.
राहुलकुमार भुरालालजी साहू (वय ३२, रा. मंगलवाडा, जि. चितोडगढ, राजस्थान) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. साहूविरुद्ध विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साहू पुण्यात कोणाला अफू विक्री करणार होता, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.
लोहगाव भागातील पोरवाल रस्त्यावर एकजण अफू विक्रीसाठी येणार असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस कर्मचारी योगेश मांढरे यांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून साहूला पकडले. साहूकडील पिशवीची झडती घेण्यात आली. तेव्हा पिशवीत अफू सापडली. त्याच्याकडून पाच किलो ५१९ ग्रॅम अफू जप्त करण्यात आली आहे.
पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक सुनील थोपटे, उपनिरीक्षक शुभांगी नरके, दिगंबर चव्हाण, योगेश मांढरे, शिवाजी घुले, संतोष देशपांडे, चेतन गायकवाड, संदीप शेळके, महेश साळुंके आदींनी ही कारवाई केली. अमली पदार्थ विरोधी पथकाने चार दिवसांपूर्वी फुरसुंगी भागातून मोहनलाल मेगाराम बिश्णोई (वय २५,रा. राजस्थान) याला अफू विक्री प्रकरणात पकडले होते. त्याच्याकडून ६० लाख रुपयांची तीन किलो अफू जप्त करण्यात आली होती.