Sunday, September 8, 2024
Homeताजी बातमीमराठी मनोरंजनसृष्टीच्या विकासासाठी लवकरच ‘ऑनलाईन फिल्म बाजार पोर्टल’ – चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक...

मराठी मनोरंजनसृष्टीच्या विकासासाठी लवकरच ‘ऑनलाईन फिल्म बाजार पोर्टल’ – चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.अविनाश ढाकणे

राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील चित्रपट महोत्सवात फिल्म बाजार या संकल्पनेअंतर्गत लेखक, दिग्दर्शक, निर्माते, तंत्रज्ज्ञ यांना एकत्र आणून सुलभ चित्रपटनिर्मितीच्या दृष्टीने प्रयत्न केले जातात. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही मराठी चित्रपटांशी संबंधित व्यक्ती, संस्था यांना एकत्र आणत चित्रपट निर्मितीपासून ते वितरणापर्यंतच्या सोयीसुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देणारे शासकीय पोर्टल लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी, आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.अविनाश ढाकणे यांनी शुक्रवारी दादासाहेब फाळके चित्रनगरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

फिल्म बाजारच्या धर्तीवर विकसित करण्यात येत असलेल्या या फिल्मबाजार पोर्टलसाठी शासनाच्या वतीने समिती गठित करण्यात आली आहे. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी, आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.अविनाश ढाकणे हे या समितीचे अध्यक्ष आहेत. तर प्रसिद्ध अभिनेता स्वप्नील जोशी, दिग्दर्शक महेश कोठारे, निर्माते संजय जाधव, उद्योजक केतन मारू आणि संदीप घुगे हे या समितीचे सदस्य म्हणून काम पाहणार आहेत. शासनाच्या वतीने पहिल्यांदाच चित्रपट लेखक, निर्माते, दिग्दर्शक, तंत्रज्ञ, कलाकार यांना एकाच व्यासपीठावर आणण्याच्या उद्देशाने हे पोर्टल सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. ढाकणे यांनी यावेळी दिली.

मराठी चित्रपट उद्योगाला अशा व्यासपीठाची गरज होती. मराठी चित्रपटकर्मींच्या गरजा पूर्ण करण्यासाठी राज्य शासनामार्फत असे पोर्टल सुरू होते आहे, याबद्दल महेश कोठारे यांनी समाधान व्यक्त केले. फिल्म बाजार ऑनलाईन पोर्टल हे मराठी मनोरंजन उद्योगातील सर्व घटकांना, व्यक्तींना आणि संस्थांना एकत्र आणणारे व्यासपीठ आहे. चित्रनगरीचे नाव त्याच्याशी जोडले गेल्याने या पोर्टलच्या कामाला अधिक बळ मिळाले आहे, अशी भावना अभिनेता स्वप्नील जोशी यांनी यावेळी व्यक्त केली. पोर्टलसाठी गठित करण्यात आलेल्या समितीच्या माध्यमातून जास्तीत जास्त चित्रपट निर्मात्यांपर्यंत पोहोचणे आणि ज्यांना चित्रपट निर्मितीसाठी सहाय्य हवे आहे त्यांच्यापर्यंत या निर्मात्यांना पोहोचवण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हे पोर्टल पुढच्या सहा महिन्यांत पूर्णपणे कार्यरत होईल. मात्र पोर्टलचे काम प्रत्यक्षदर्शी पद्धतीने सुरू झाले असून यापुढेही ऑनलाईन आणि प्रत्यक्ष अशा दोन्ही पद्धतीने काम होणार असल्याचे स्वप्नील जोशी यांनी यावेळी सांगितले. चित्रपट वितरणासाठी प्रत्यक्ष चित्रपटगृहे, दूरचित्रवाहिनी आणि ओटीटीच्या माध्यमातून सहकार्य कसे करता येईल यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू, असे ‘शेमारू’ कंपनीचे केतन मारू यांनी सांगितले.

फिल्म बाजार पोर्टलची संकल्पना अभिनेते स्वप्नील जोशी यांची आहे. त्यांच्या या संकल्पनेचे स्वागत करत त्यावर तातडीने समिती गठित करून काम सुरू करण्याचे आदेश सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले होते. चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली पोर्टलचे काम सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती संदीप घुगे यांनी दिली. मराठीत चांगले चित्रपट यायला हवेत आणि ते जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचायला हवेत, यासाठी पोर्टलच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार आहेत. ज्यांना ज्यांना चित्रपट निर्मिती, चांगली कथा, तांत्रिक मदत तसेच चित्रपट विक्रीच्या दृष्टीने काही अडचणी असतील त्यांनी पोर्टलशी संपर्क साधावा, असे आवाहन श्री. घुगे यांनी केले. पोर्टल विकसित होईपर्यंत चित्रनगरी येथेच या समितीशी संपर्क साधता येईल, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments