Thursday, September 28, 2023
Homeताजी बातमीनिर्यातबंदी नंतरही कांदा तेजीतच ...

निर्यातबंदी नंतरही कांदा तेजीतच …

२२ सप्टेंबर २०२०,
निर्यातबंदी झाल्याने कांद्याचे दर कमी होतील, अशी शक्यता व्यक्त होत असताना किरकोळ बाजारात कांदा दरात तेजी निर्माण झाली आहे. महाराष्ट्रासह दक्षिणेकडील राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील जुन्या कांद्याला मागणी वाढली असून जुन्या कांद्याची आवक अपुरी पडत असल्याने कांदा दरात तेजी निर्माण झाली आहे.

महाराष्ट्र, कर्नाटक या दोन राज्यात कांद्याची मोठय़ा प्रमाणावर लागवड केली जाते. गेल्या महिन्याभरापासून महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे शेतात लागवड करण्यात आलेल्या कांदा रोपांचे नुकसान झाले आहे. महाराष्ट्रातील नवीन कांद्याचा हंगाम नोव्हेंबर महिन्यात सुरू होतो. त्यामुळे महाराष्ट्रातील नवीन कांद्याचा हंगाम लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. कर्नाटकातील नवीन लाल कांद्याचा हंगाम सप्टेंबर महिन्यात सुरू होतो. मात्र, तेथे झालेल्या पावसामुळे नवीन कांद्याचे मोठे नुकसान झाले असून कांद्याच्या प्रतवारीवर परिणाम झाला आहे, अशी माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्डातील कांदा व्यापारी रितेश पोमण यांनी दिली.

महाराष्ट्रातील कांद्याला दक्षिणेकडील राज्यासह देशभरातून मागणी आहे. चाळीत साठवलेला जुना कांदा सध्या बाजारात विक्रीस पाठविला जात आहे. मार्केटयार्डातील घाऊक बाजारात दररोज ४० ते ५० ट्रक कांद्याची आवक होत आहे. घाऊक बाजारात चांगल्या प्रतीच्या दहा किलो जुन्या कांद्याला ३६० ते ४०० रुपये असे दर मिळाले आहेत. मध्यम प्रतीच्या दहा किलो कांद्याला ३०० ते ३५० रुपये असे दर मिळाले आहेत. गेल्या दोन ते तीन दिवसात कांद्याच्या दरात प्रतिकिलोमागे १० ते १५ रुपयांनी वाढ झाली आहे, असे त्यांनी सांगितले.

भिस्त महाराष्ट्रावर

कर्नाटकातील नवीन कांद्याचा हंगाम सुरू झाला आहे. मात्र, मुसळधार पावसामुळे तेथील कांदा खराब झाला आहे. महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडे जुन्या कांदाचा साठा आहे. मागणीच्या तुलनेत जुन्या कांद्याची आवक अपुरी पडत आहे. निर्यातबंदी लागू झाल्यानंतर कांदा दरात घसरणीची शक्यता होती. प्रत्यक्षात मात्र देशांतर्गत बाजारपेठेत असलेल्या वाढत्या मागणीमुळे कांदा दरात तेजी निर्माण झाली आहे.

पन्नाशी गाठण्याची शक्यता

चांगल्या प्रतीच्या जुन्या कांद्याला मागणी वाढत असून गेल्या तीन दिवसात कांद्याच्या दरात प्रतिकिलोमागे १० ते १५ रुपयांनी वाढ झाली आहे. सध्या जुन्या कांद्याची विक्री ४० ते ४५ रुपये दराने केली जात आहे. कांद्याची आवक कमी झाल्यास कांद्याचे दर ५० रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे, असे कांदा व्यापारी रितेश पोमण यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments