शहरात आयोजित करण्यात आलेल्या ‘एक संधी वंचितला’ या भव्य निर्धार सभेत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी सत्ताधारी व्यवस्थेवर जोरदार टीका करत नागरिकांना त्यांच्या संविधानिक हक्कांसाठी सजग राहण्याचे आवाहन केले. हजारो नागरिकांच्या उपस्थितीत झालेल्या या सभेत त्यांनी मतदान प्रक्रिया, झोपडपट्टी पुनर्वसन, SRA योजना, घरकुल, तसेच देशाच्या राजकीय व परराष्ट्र धोरणांवर ठाम आणि परखड भूमिका मांडली.
बाळासाहेब आंबेडकर म्हणाले की, मतदानाचा हक्क न वापरल्यास तो चोरीला गेला असे म्हणता येईल; मात्र मतदान करूनही मत चोरी झाल्याची ओरड करणे ही जनतेची दिशाभूल आहे. प्रत्यक्षात मतदान केंद्रांवर बसलेले अधिकारीच १०० ते १५० मते सत्ताधारी पक्षाच्या बाजूने टाकतात. ही मतांची चोरी नसून सत्ताधाऱ्यांना अतिरिक्त मते देण्याची पद्धतशीर प्रक्रिया असल्याचा आरोप त्यांनी केला. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक (भीमसृष्टी) मागील मैदानावर आयोजित सभेत बोलत होते. यावेळी सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या ११३ व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
सभेच्या सुरुवातीला गायक मेघानंद जाधव यांच्या भीमगीतांनी वातावरण भारावून गेले. समता सैनिक दलाच्या वतीने ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यात आली.
पिंपरी-चिंचवड शहरातील झोपडपट्टीवासीयांच्या प्रश्नांवर बोलताना त्यांनी मुस्लिम समाजाला लक्ष्य केले जात असल्याचा आरोप केला. शहरात सुमारे २० हजार मुस्लिमांच्या घरांवर बुलडोझर कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. झोपडपट्टी धारकांनी आता स्वतः पुढे येण्याची वेळ आली असून, झोपडपट्टी धारक निवडणुकीला उभा राहिल्यास त्याला वंचित बहुजन आघाडीचे तिकीट दिले जाईल, असे त्यांनी ठामपणे स्पष्ट केले. झोपडपट्टी धारकांचा प्रतिनिधी सभागृहात पोहोचवणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
घरकुल व SRA योजनांबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट भूमिका मांडत सांगितले की, जोपर्यंत कायमस्वरूपी घर मिळत नाही, तोपर्यंत किमान १५ हजार रुपये घरभाडे मिळाले पाहिजे. खासगी बिल्डरने SRA प्रकल्प राबवताना १५ हजार रुपये भाडे देण्याची लेखी हमी दिल्याशिवाय कोणतीही परवानगी देऊ नये, असा इशाराही त्यांनी दिला.
देशाच्या अंतर्गत व परराष्ट्र धोरणांवर टीका करताना बाळासाहेब आंबेडकर म्हणाले की, देशाची राजकीय परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. पंतप्रधान चीन मित्र असल्याचे सांगतात, तर लष्करप्रमुख चीन शत्रू असल्याचे म्हणतात. अशा परिस्थितीत विश्वास कोणावर ठेवायचा, हा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून धर्माच्या नावावर राजकारण सुरू असल्याने आज भारताचा एकही खरा मित्र उरलेला नाही, असा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, प्रबुद्ध भारत टीमच्या वतीने बाळासाहेब आंबेडकर यांच्या संसदेतील १०० हून अधिक ऐतिहासिक आणि दिशादर्शक भाषणांवर आधारित विशेष मालिकेची घोषणा करण्यात आली. या मालिकेचा प्रभावी टिझर सभास्थळी प्रदर्शित करण्यात आला असून, नागरिकांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. लवकरच ही मालिका प्रबुद्ध भारतच्या माध्यमातून प्रसारित होणार आहे.
यावेळी राज्य उपाध्यक्ष अनिल जाधव, सर्वजित बनसोडे, शहराध्यक्ष नितीन गवळी यांच्यासह ॲड. अरविंद तायडे, अनिता चव्हाण, विनोद गायकवाड, आस्मा शेख, संतोष लोखंडे यांनीही आपली मते मांडली. हजारो नागरिकांच्या उपस्थितीत झालेली ही सभा आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीची दिशा आणि लढ्याची तयारी स्पष्ट करणारी ठरली.


