धुळवडीला रंग खेळून हातपाय धुण्यासाठी इंद्रायणी नदीत उतरलेल्या महाविद्यालयीन युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी घडली. तळेगाव दाभाडे परिसरातील वराळे गावात ही घटना घडली.
जयदीप पुरुषोत्तम पाटील (वय २१, मूळ रा. तारखेड, पाचोरा जळगाव) असे मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयदीप तळेगाव दाभाडे परिसरातील आंबी येथील डाॅ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात संगणक शाखेत तृतीय वर्षात होता.
अभियांत्रिकी महाविद्यालयातील सात ते आठ विद्यार्थी रंग खेळून वराळे गाव परिसरातील इंद्रायणी नदीपात्रात दुपारी साडेबाराच्या सुमारास हातपाय धुण्यासाठी उतरले. त्या वेली जयदीपचा पाय घसरला आणि तो पाण्यात बुडाला. त्याच्याबरोबर असलेल्या मित्रांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. जयदीप पाण्यात बुडाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याचा मित्र शरद राठोड याने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. तळेगाव एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने पाण्यात बुडालेल्या जयदीपचा शोध घेतला. दोन तासानंतर त्याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला.