पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती साजरी करण्यात आली.
पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, मुख्य लिपिक वसिम कुरेशी तसेच अभिजीत डोळस,सचिन महाजन,संजय शिंदे आणि विविध विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
क्रांतिसिंह नाना पाटील हे महाराष्ट्रातील एक प्रखर देशभक्त, झुंझार नेते म्हणून ओळखले जातात. त्यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील एका शेतकरी कुटुंबात झाला. नानांचे वडील रामचंद्र हे गावचे पाटील होते. नानांचे प्राथमिक शिक्षण गावी झाले आणि ते मुलकीपरीक्षा उत्तीर्ण झाले यानंतर त्यांना तलाठ्याची नोकरी मिळाली. पुढे सत्यशोधक चळवळीकडे ते आकृष्ट झाले. त्यांनी ग्रामीण भागातून दौरे काढून तत्कालीन समाजातील अंधश्रद्धा, हुंड्यासारख्या अनिष्ट प्रथा व चालीरीती यांविरुद्ध लोकमत जागृत केले. अनेक अनिष्ट चालीरीतीविरुद्ध त्यांनी बंड पुकारले. १९४२ च्या ‘छोडो भारत’ आंदोलनात भूमिगत राहून कार्य करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्या नुसार सातारा जिल्ह्यात काही सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी प्रतिसरकार स्थापन केले व ब्रिटिश शासन बंद पाडण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला होता.