टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचणारा स्टार खेळाडू नीरज चोप्रा याला आता परम विशिष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे. एकूण ३८४ जणांना शौर्य पुरस्कार जाहीर झाले आहेत. याच यादीत नीरज चोप्रालाही स्थान मिळाले आहे. ७३ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपतींच्या हस्ते ३४८ जणांना शौर्य पुरस्कार जाहीर करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये १२ शौर्य चक्र, २९ परम विशिष्ट सेवा पदके, ४ उत्तम युद्ध सेवा पदके, ५३ अति विशिष्ट सेवा पदके, १३ युद्ध सेवा पदकांचा समावेश आहे. टोकियो ऑलम्पिकमध्ये भालाफेकीत सुवर्णपदक जिंकून भारताची मान जगभरात उंचवणाऱ्या युथ आयकॉन नीरज चोप्रासाठी हा मोठा सन्मान असेल. ऑलिम्पिकमध्ये मेडल जिंकल्यानंतर नीरज चोप्रा देशातील प्रत्येकाचा हिरो झाला आहे.
प्रजासत्ताक दिनानिमित्तशौर्य पुरस्कार मिळविण्याऱ्या विजेत्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. यावेळी ९३९ पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांच्या धाडसाबद्दल गौरवण्यात येणार आहे. यामधील १८९ गौरवमूर्तींना पोलीस पदक जाहीर करण्यात आले आहे. तर ८८ जणांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक (PPM) आणि ६६२ जणांना उत्कृष्ट सेवेसाठी पोलीस पदक (PM) देण्यात येणार आहे. पोलीस पदक प्राप्त १८९ शौर्यवीरांपैकी १३४ जवानांना जम्मू आणि काश्मीर प्रदेशातील त्यांच्या शौर्याबद्दल गौरविण्यात येत आहे. दरवर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त देशाच्या सुरक्षेत अतुलनीय शौर्य दाखवणाऱ्या शूर सैनिकांना शौर्य पुरस्काराने गौरविले जाते. पोलीस पदकासाठी छत्तीसडमधील त्यांच्या अतुलनीय कार्यासाठी १० जण, दिल्लीतील ३, झारखंडमधील २, मध्य प्रदेशचे ३ मणिपूर, उत्तर प्रदेशमधील १ आणि ओरिसामधील धैर्यासाठी ९ जणांना पोलीस पदकाने गौरविण्यात येणार आहे. यावेळी पुरस्कारामध्ये केंद्रीय राखीव दलातील ३० पोलिसांचा समावेश आहे, तर शस्त्रात सीमा दलातील ३ जवानांना पोलीस पदक प्रदान केले जाणार आहे.
प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या शौर्य पुरस्कार प्रदान सोहळ्यात तुरुंग अधिकाऱ्यांनाही सेवा पुरस्कार दिला जाणार आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. २६ जानेवारीच्या राजपथावरील संचलनाअगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय समर स्मारकामध्ये देशासाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांना अभिवादन करून देशाला संबोधित करणार आहेत. त्यानंतर तिबेट सीमा दलातील पुरुषांची तुकडी आणि महिलांची तुकडी दुचाकीच्या कवायती दाखवणार आहेत.