स्वप्नीलने भारताचा तिरंगा फडकावल्याचा अभिमान आहे अशी प्रतिक्रिया स्वप्नील कुसळेचे वडील सुरेश कुसळे यांनी दिली आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने तिसरे पदक जिंकले आहे. नेमबाज स्वप्नील कुसळेने 50 मी. रायफल थ्री पोझिशनच्या पुरुष गटात कांस्यपदक जिंकले. मूळचा कोल्हापूरचा असलेल्या स्वप्नीलने ऑलिम्पिकमध्ये घेतलेल्या भरारीमुळे देशभरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. रेल्वेत नोकरी करण्यापासून ते ऑलिम्पिक विजेतेपद मिळ्वण्यापर्यंतचा त्याचा प्रवासही रंजक आहे.
आम्हाला आमच्या मुलाचा अभिमान, कुटुंब भावुक
त्याने पदक पटकावल्यानंतर त्याच्या आई वडिलांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला आहे. स्वप्नीलचे वडील म्हणाले, 12- 13 वर्षांची स्वप्नीलची तपश्चर्या तो कधीही विसरणार आहे. त्याच्यासाठी आमच्या कुटुंबानेही खूप मोठी तपश्चर्या केली आहे. भारताचा तिरंगा तो कधीही खाली पडू देणार नाही याची खात्री होती. तो तिसरा आला असला तरी त्याने भारताचा तिरंगा फडकावल्याचा मला अभिमान आहे”. तर स्वप्निलच्या आई अनिता कुसळे यांनी मला माझ्या मुलाचा अभिमान असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी स्वप्नीलचे कुटुंब भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.
कोण आहे स्वप्नील कुसळे?
स्वप्नील कुसाळे हा महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील आहे. नेमबाज स्वप्निल कुसाळे कोल्हापुरातील राधानगरी तालुक्यातील आहे. 6 ऑगस्ट 1994 मध्ये जन्मलेल्या स्वप्निलने पॅरिसच्या धरतीवर चमक दाखवली. स्वप्निलचा ऑलिम्पिकपर्यंतचा प्रवास खूपच रंजक आहे. अभिनव बिंद्राला 2008 च्या ऑलिम्पिकमध्ये खेळताना पाहण्यासाठी स्वप्निलने 12वीच्या परिक्षेकडे कानाडोळा केला. 2009 मध्ये वयाच्या 14व्या वर्षी त्याच्या वडिलांनी स्वप्निलला महाराष्ट्र सरकारच्या क्रीडा प्रबोधिनी योजनेत दाखल केले. तिथूनच त्याचा क्रीडा क्षेत्रातील प्रवास सुरू झाला.
रेल्वेमध्ये होता कार्यक्रात
सुरुवातीच्या काळात त्याने नेमबाजीतील आपले कौशल्य विकसित करण्यासाठी पुण्याला जाण्यापूर्वी नाशिकमध्ये प्रशिक्षण घेतले. या 28 वर्षीय नेमबाजाची जीवनकहाणी भारतीय क्रिकेटपटू एमएस धोनी याच्या आयुष्यासारखीच आहे. 2012 पासून आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. स्वप्नील कुसाळे 2015 पासून मध्य रेल्वेत कार्यरत आहे. 2008 मध्ये अभिनव बिंद्राने ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकल्यानंतर स्वप्नीलला प्रेरणा मिळाली. ती मॅच पाहण्यासाठी त्याने 12 वीचा पेपरही बुडवला होता.
एमएस धोनीला मानतो आदर्श
एमएस धोनी त्याच्या आयुष्यात तिकीट कलेक्टर होता, त्याचप्रमाणे स्वप्नील देखील मध्य रेल्वेमध्ये तिकीट कलेक्टर म्हणून काम करतो. भारताचा हा प्रतिभावान नेमबाज महेंद्रसिंग धोनीच्या व्यक्तिमत्त्वाने खूप प्रभावित आहे. स्वप्नील म्हणतो की त्याने एमएस धोनीचा बायोपिक अनेकदा पाहिला आहे आणि दिग्गज क्रिकेटपटूच्या कामगिरीपासून प्रेरणा घेतली आहे. धोनी क्रिकेटच्या मैदानावर त्याच्या शांत स्वभावासाठी ओळखला जातो, तर शूटिंगसाठी देखील शांत आणि संयमशील स्वभावाची आवश्यकता असते. त्यामुळेच स्वप्नील धोनीसोबत आयुष्य जोडू शकतो.
मलाही धोनीप्रमाणे शांत राहण्याची गरज- स्वप्नील
एमएस धोनीला आपला आदर्श मानून स्वप्नील म्हणाला, “मी नेमबाजीच्या जगात कोणत्याही विशिष्ट खेळाडूला फॉलो करत नाही. शूटिंगच्या बाहेरच्या जगात धोनीच्या व्यक्तिमत्त्वाची मी प्रशंसा करतो. धोनी जसा क्रिकेटच्या मैदानावर शांत राहतो, तसाच माझा खेळही. मला शांत आणि सहनशील स्वभावाची देखील गरज आहे कारण मी त्याच्या प्रमाणेच तिकीट कलेक्टर म्हणून काम करतो”.
आई सरपंच, वडील शिक्षक
स्वप्नीलने 2012 मध्ये त्याच्या आंतरराष्ट्रीय शूटिंग करिअरला सुरुवात केली. त्याचे वडील आणि भाऊ दोघेही शिक्षक आहेत आणि त्याची आई कांबळवाडी गावची सरपंच आहे. नववीत असताना त्याला सायकलिंग की रायफल यापैकी एकाची निवड करण्यास सांगितले आणि त्याने रायफल उचलली होती. पहिल्यांदा त्याला रायफल दिली तेव्हा त्याने 10 पैकी नऊ शॉट्स अचूक मारले. तेव्हा त्याला बंदुकही माहित नव्हती असे त्याचे वडील सांगतात.
वडिलांनी काढले होते कर्ज
शिवाय पिस्तुल हा खर्चिक खेळ आहे आणि त्याचे दडपण वडिलांनी कधीच स्वप्नीलवर येऊ दिले नाही. ते सांगतात,”2012 मध्ये त्याची जर्मनीतल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी पहिल्यांदा निवड झाली आणि तेव्हा मी दीड लाखाचं कर्ज घेऊन त्याला पाठवलं. त्या स्पर्धेत त्याला चांगली कामगिरी करता आली नाही. पण, त्याने पुन्हा कसून सराव केला आणि 2015 मध्ये 18 पेक्षा कमी वय असताना केरळमध्ये खुल्या गटात रौप्यपदक जिंकले”.
यापूर्वी अनेक स्पर्धांमध्ये पटकावले विजेतेपद
दरम्यान, यापूर्वी 2022 मध्ये स्वप्नीलने 22 ऑक्टोबर रोजी इजिप्तमधील कैरो इथं झालेल्या जागतिक चॅम्पियनशिपमध्ये चौथ्या स्थानासह पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3-पोझिशन स्पर्धेत ऑलिम्पिक कोटा बर्थ जिंकला होता. 2023 मध्ये चीनमधील आशियाई क्रीडा स्पर्धा, 2022 मध्ये बाकू येथील विश्वचषक आणि 2021 मध्ये नवी दिल्ली इथं नेमबाजीत स्वप्नील हा सुवर्णपदकाचा मानकरी ठरला होता. याशिवाय त्याने 2015 ते 2023 या कालावधीत विविध नेमबाजी स्पर्धेत रौप्य आणि कांस्य पदकं जिंकली आहेत.
72 वर्षांनी मिळाले भारताला पदक
तब्बल 72 वर्षांनी कोल्हापूरच्या खेळाडूंनी ऑलम्पिक मध्ये वैयक्तिक क्रीडा प्रकारात पदक मिळवले. 1952 मध्ये हेलसिंकी येथे झालेल्या ऑलिपिक स्पर्धेमध्ये खाशाबा जाधव यांनी कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक पटकावले होते. तर स्वप्निलच्या विजयानंतर यंदा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला तिसरे पदक मिळाले आहे.