महानगरपालिकेतील सर्व अधिकारी आणि कर्मचा-यांनी २० नोव्हेंबर रोजी होणा-या विधानसभा निवडणूकीत मतदानाचा हक्क बजावून लोकशाही उत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आज भारताच्या माजी पंतप्रधान भारतरत्न इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच माजी उपपंतप्रधान सरदार भारतरत्न वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्या हस्ते त्यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमात उपस्थित कर्मचा-यांनी मतदानाची शपथ घेतली त्यावेळी मार्गदर्शन करताना अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर बोलत होते.या कार्यक्रमास उप आयुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, कर्मचारी महासंघाचे बालाजी अय्यंगार आणि महापालिका कर्मचारी उपस्थित होते.
आज झालेल्या महापुरुषांच्या अभिवादन कार्यक्रमात कर्मचा-र्यांनी “आम्ही, भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, याद्वारे प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करु आणि मुक्त निःपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणूकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणूकीत निर्भयपणे तसेच आम्ही धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू.” अशी शपथ घेऊन १०० % मतदान करण्याचा निर्धार केला.
महापालिकेच्या वतीने आयुक्त शेखर सिंह आणि अतिरिक्त आयुक्त तथा स्वीप नोडल विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उप आयुक्त अण्णा बोदडे यांच्या नियंत्रणाखाली मतदार जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे त्या अनुषंगाने आजच्या कार्यक्रमात मतदानाची शपथ घेण्यात आली.
प्रफुल्ल पुराणिक यांनी शपथेचे वाचन केले.