Saturday, March 2, 2024
Homeउद्योगजगतआता ट्रेनमध्ये रात्री दहानंतर गोंगाट केल्यास खैर नाही…रेल्वेचे महत्त्वाचे निर्देश जारी

आता ट्रेनमध्ये रात्री दहानंतर गोंगाट केल्यास खैर नाही…रेल्वेचे महत्त्वाचे निर्देश जारी

भारतीय रेल्वेने प्रवाशांना अधिकाधिक चांगली सेवा देण्यासाठी विविध नियम बनवलेले आहेत. प्रवाशांच्या तक्रारी आणि सूचना विचारात घेऊन त्यात सातत्याने सकारात्मक बदल करण्यात येत असतात. याच मालिकेत आता रात्रीच्या प्रवासाबाबत नियमांत महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. प्रवाशांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्यानंतर रेल्वे प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये रात्रीच्या वेळी काही प्रवाशांच्या बेशिस्त वर्तनामुळे इतर प्रवाशांना त्रास होतो. त्यांची झोपमोड होते. यावरून प्रवाशांमध्ये खटके उडाल्याचे व प्रकरण हाणामारीपर्यंत गेल्याचे अनेकदा पाहायला मिळाले आहे. याबाबत रेल्वेकडे खूप मोठ्या प्रमाणात तक्रारी येत होत्या. आमच्या कंपार्टमेंटमध्ये काही प्रवासी मोठमोठ्या आवाजात बोलत आहेत, डब्यात गोंगाट सुरू आहे, मोबाइलवर मोठ्या आवाजात गाणी लावली गेली आहेत, हुल्लडबाजी सुरू आहे, अशाप्रकारच्या तक्रारींचा खच पडला आहे. या तक्रारींची गंभीर दखल घेत हा प्रकार रोखण्यासाठी रेल्वेने महत्त्वाचे निर्देश जारी केले आहेत. त्याची कठोरपणे अंमलबजावणी करण्यासही बजावण्यात आले असून रात्रीच्या प्रवासात गोंगाट केल्यास संबंधित प्रवाशाला आता चांगलीच अद्दल घडणार आहे.

लांब पल्ल्याच्या गाडीत रात्री १० नंतर फोकस लाइट वगळता केबिनमधील इतर लाइट बंद करण्यात याव्यात. डब्यातील इतर प्रवाशांना त्रास होऊ नये यासाठी आपसात मोठ्या आवाजात बोलणे टाळावे. जर हा नियम कुणी मोडला व याबाबत रेल्वेकडे तक्रार आली तर संबंधित प्रवाशावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा रेल्वेकडून देण्यात आला आहे. तिकीट चेकिंग स्टाफ, रेल्वे सुरक्षा दल, कोच अटेंडंट, कॅटरिंग स्टाफ, मॅनेजमेंट स्टाफ यांनाही या अनुषंगाने सूचना देण्यात आल्या आहेत. रात्रीच्यावेळी ट्रेनमध्ये गोंधळ, मोठा आवाज होणार नाही याची दक्षता घ्यावी, कुणी नियम मोडत असेल तर त्याला रोखावे, असे स्पष्ट निर्देश रेल्वेने दिले आहेत. ही एकप्रकारे नवीन मोहीमच राबवली जाणार असून या आठवड्यापासूनच याची सुरुवात करण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे रात्री ट्रेनमध्ये गोंगाट करणाऱ्यांची आता खैर नसेल.

दरम्यान, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, एकट्याने प्रवास करणारी महिला यांना गरज असेल तर तत्काळ मदत दिली जावी, अशा सूचनाही रेल्वे प्रशासनाकडून दिल्या गेल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Ghe Bharari

Most Popular

Recent Comments