Tuesday, July 16, 2024
Homeमहाराष्ट्रआता सगळेच म्हणू लागलेत " पुणे की पसंत मोरे वसंत "- वसंत...

आता सगळेच म्हणू लागलेत ” पुणे की पसंत मोरे वसंत “- वसंत मोरे यांचे सूचक व्हाट्सॲप स्टेट्स चर्चेत

पुण्यात सगळ्या पक्षाकडून लोकसभेच्या निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. सगळ्याच पक्षांकडून पक्षबांधणीलादेखील सुरुवात झाली आहे. त्यातच आता मनसेसुद्धा तयारीला लागल्याचं दिसत आहे. मनसेचे फायरब्रॅंड नेते वसंत मोरे यांच्याकडून आता मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. वसंत मोरेंकडून लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि जनता दरबार घेत वसंत मोरे हे सतत चर्चेत असतात.

मोर्चेबांधणी करताना आज पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीचे संकेत देणारं स्टेटस ठेवलं आहे. “आता सगळेच म्हणू लागलेत पुणे की पसंत मोरे वसंत”, अशा शब्दात त्यांनी सोशल मीडियावर स्टेट्स ठेवलं आहे. सध्या पुण्यात मनसेतर्फे लोकसभेसाठी तयारी सुरु करण्यात आली आहे. त्यात लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी मनसेत इच्छुकांची संख्या वाढली.

साईनाथ बाबर आणि वसंत मोरे यांच्यात रस्सीखेच
पुणे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी साईनाथ बाबर आणि वसंत मोरे यांच्यात अनेकदा रस्सीखेच होत असल्याचं पाहायला मिळालं आहे. पुण्यात मनसेचे दोन गट पडल्याचं स्पष्ट नसलं तरीही त्यांचे वाद कायम समोर आले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरच्या भोंग्यांवर भूमिका घेतली होती. हे भोंगे बंद करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते. त्यांच्या या निर्णयाला वसंत मोरे यांनी काहीसा विरोध केला होता. त्यामुळे वसंत मोरे यांना शहराध्यक्षपदावरुन काढून टाकण्यात आलं होतं आणि त्यानंतर साईनाथ बाबर यांना शहराध्यक्षपद दिलं होतं. तेव्हापासून वसंत मोरे आणि साईनाथ बाबार यांच्यात रस्सीखेच किंवा धुसफूस सुरु असल्याचं दिसून आलं. मनसेच्या अनेक कार्यक्रमातदेखील हे बघायला मिळालं. येत्या काहीच दिवसांत लोकसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यासाठीदेखील दोघांमध्ये रस्सीखेच सुरु असल्याचं दिसत आहे.

स्टेटसमुळे खळबळ
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी पुण्यात बोलताना साईनाथ बाबरांना मोठी संधी देण्याबद्दल सुतोवाच केले होते. यानंतर आता पुण्यातील मनसे नेते वसंत मोरे यांनी सूचक व्हाट्सॲप स्टेट्स ठेवल्यानंतर पुन्हा एकदा मनसेच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. शर्मिला ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर काही तासांमध्येच त्यांनी स्टेट्स ठेवत राजकीय खळबळ उडवून दिली आहे. “कुणासाठी कितीबी करा वेळ आली की फणा काढतातच पण मी बी पक्का गारुडी आहे, योग्य वेळी सगळी गाणी वाजवणार.” त्यामुळे वसंत मोरे यांनी नेमका कोणाला संदेश दिला आहे याची चर्चा रंगली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments