Monday, July 15, 2024
Homeमहाराष्ट्रपिंपरी चिंचवडमध्ये मराठा समाजाच्या सर्वेक्षणाला दांडी मारणाऱ्या १३० कर्मचाऱ्यांना नोटीसा..

पिंपरी चिंचवडमध्ये मराठा समाजाच्या सर्वेक्षणाला दांडी मारणाऱ्या १३० कर्मचाऱ्यांना नोटीसा..

मराठा, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा या समाजाचे आर्थिक आणि सामाजिक मागासलेपण तपासण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने सुरू असलेल्या सर्वेक्षणात अडथळ्याची शर्यत दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे. सर्व्हर डाऊन होणे, लाॅगइनसह अनेक तांत्रिक अडचणी येत असून एका कुटुंबाची माहिती घेण्यास २० मिनिटांचा वेळ लागत आहे. दरम्यान, सर्वेक्षण कामाला दांडी मारणाऱ्या १३० कर्मचाऱ्यांना नोटीसा बजाविल्या असून चोवीस तासात हजर होण्याचे आदेश दिले आहेत. अन्यथा निलंबन करण्याचा इशारा दिला आहे.

करसंकलन विभागाच्या १७ झोननुसार घरांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. मराठा, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा अशी जात असल्यास त्या कुटुंबाची संपूर्ण माहिती भरून घेण्यात येत आहे. १८२ छोटे पर्याय प्रश्न आहेत. एका कर्मचा-यास दिवसाला ५० घरांचे सर्वेक्षण करण्याचे उद्दिष्ट आहे. त्या कर्मचाऱ्याला सात दिवसांत ४०० घरांना भेट द्यावी लागणार आहे. दोन हजार कर्मचारी सहा लाख १५ हजार घरांना भेटी देणार आहेत. १५ कर्मचाऱ्यांच्या कामावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक पर्यवेक्षक नेमण्यात आला आहे. मंगळवार पासून घरोघरी जाऊन सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. मात्र, विविध तांत्रिक अडचणी सलग दुसऱ्या दिवशीही आल्या. मोबाइल ॲपमधील काही ऑप्शन उघडले जात नाहीत. त्यामुळे सर्वेक्षणाचा फज्जा उडताना दिसत आहे.

सर्वेक्षण करण्यासाठी महापालिकेने नोडल अधिकारी, पर्यवेक्षक व प्रगणक नेमले आहेत. त्यांना प्रशिक्षण देण्यात आले. सर्वेक्षणासाठी १६२ पर्यवेक्षक नेमले असून १५६ जण प्रशिक्षणाला उपस्थित हाेते. सहा जण गैरहजर हाेते. तर एक हजार ७३२ प्रगणक नेमले आहेत. त्यापैकी १३० प्रगणक गैरहजर हाेते. १३० जणांनी प्रशिक्षण घेतले नसून त्यांनी सर्वेक्षणाचे कामही सुरू केले नाही. या सर्व कर्मचा-यांना कारणे दाखवा नाेटीस बजाविण्यात आली आहे. येत्या २४ तासात कामावर रूजू न झाल्यास निलंबनाची कारवाई करण्याचा इशारा महापालिकेचे सहायक आयुक्त तथा सहायक झाेनल अधिकारी अविनाश शिंदे यांनी दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments