Saturday, May 25, 2024
Homeआरोग्यविषयकघरगुती कचऱ्याचे विलगीकरण न करणे पडणार महागात; १ एप्रिलपासून महापालिका दंडात्मक कारवाई...

घरगुती कचऱ्याचे विलगीकरण न करणे पडणार महागात; १ एप्रिलपासून महापालिका दंडात्मक कारवाई करणार…

घरगुती कचऱ्याचे ओला आणि सुका असे विलगीकरण करून न देणाऱ्या नागरिकांवर एक एप्रिलपासून दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा पिंपरी-चिंचवड महापालिकेने दिला आहे. वेळप्रसंगी एकत्रित कचरा उचलणार नसल्याचेही महापालिकेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

महापालिकेकडून ओला आणि सुका कचऱ्यावर वेगवेगळ्या प्रकारे प्रक्रिया केली जाते. शहरात रोज सुमारे बाराशे टन कचरा संकलन होते. त्यानुसार सद्यःस्थितीत ९० टक्के कचऱ्याचे विलगीकरण होते. त्यामुळे प्रशासनासमोर घनकचरा व्यवस्थापनाची समस्या निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आगामी काळात घरोघरी कचरा विलगीकरण बंधनकारक करण्याचे प्रशासनाने ठरवले आहे.

करोनामुळे नियम शिथिल…
कचऱ्याचे विलगीकरण करण्याचे धोरण २०१७पासून टप्प्याटप्प्याने राबविले जाते. सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणे, कचरा जाळणे, उघड्यावर शौच करणे यासाठी दंडाच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय २०१८मध्ये घेण्यात आला. याशिवाय जनजागृतीवरही भर देण्यात आला आहे. महापालिकेच्या वतीने नागरिकांना ओला आणि सुका कचरा साठवणूक करण्यासाठी बादल्यांचे मोफत वाटपही करण्यात आले. महापालिका परिसरात स्वच्छता, आरोग्य उपविधी लागू करण्याचा निर्णय २०१९मध्ये घेण्यात आला. त्यानंतर करोनाचे संकट निर्माण झाले. त्यामुळे नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली नाही.

येत्या एक एप्रिलपासून कठोर कारवाई करण्याचा निर्णय प्रशासकीय पातळीवर घेण्यात आला. त्यानुसार घरोघरी कचरा विलगीकरण करून न देणाऱ्या नागरिकांकडून दंड वसूल करण्याच्या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार आहे, असे स्पष्ट करण्यात आले. याशिवाय पालिका परिसरात रस्ते आणि मार्गावर घाण करण्यासाठी १८० रुपये, सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांना १५० रुपये, उघड्यावर लघुशंका करणाऱ्यांना २०० रुपये आणि उघड्यावर शौच करणाऱ्यांसाठी ५०० रुपये दंडाची तरतूद आहे. या निर्णयाचीही प्रशासकीय पातळीवर कठोर कारवाई केली जाईल, असे आरोग्य विभागाने म्हटले आहे.

‘स्वतंत्र कचरापेटी वापरावी’…
महापालिकेच्यावतीने मोशी कचरा डेपो येथे कचऱ्यापासून वीजनिर्मिती, हॉटेलमधील कचऱ्यावर प्रक्रिया करून बायोगॅस निर्मितीचे प्रकल्प प्रस्तावित आहेत. त्यासाठी ओला आणि सुका कचरा विलगीकरण गरजेचे आहे. त्यासाठी नागरिकांनी स्वतंत्र कचरापेटी वापरावी, असे आवाहन पालिकेने केले आहे.

दंडात्मक कारवाईची तरतूद
तपशील दंडाची रक्कम
पहिली कारवाई ~ ३००
नंतरची प्रत्येक कारवाई ~ ५००
पहिली मोठी कारवाई ~ ५,०००
नंतरची प्रत्येक मोठी कारवाई ~ १५,०००
कचरा जाळणे ~ ५,०००

प्रशिक्षण देऊनही काही ठिकाणी कचरा विलगीकरण केला जात नाही. त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. घरगुती कचरा विलगीकरण करून न दिल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाईचा इशारा आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिला आहे. त्यांच्या सूचनेनुसार येत्या एक एप्रिलपासून कठोर धोरण राबविण्यात येणार आहे.- अजय चारठणकर, उपायुक्त, आरोग्य विभाग, पिंपरी-चिंचवड पालिका

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments