विशिष्ट हेतू ठेवून सणासुदीच्या काळात व्यापारी, विकेते व सर्वसामान्य नागरिक यांच्यावरील एकतर्फी कारवाई खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा खासदार श्रीरंग बारणे यांनी महापालिका व पोलीस अधिकाऱ्यांना मंगळवारी पिंपरीत एका बैठकीत दिला. नियमानुसार व खातरजमा करूनच कारवाई करावी, असे स्पष्ट करून सर्वांनी सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.
पिंपरी-चिंचवड शहरातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या पिंपरीतील व्यापाऱ्यांच्या विविध प्रश्नांसदर्भात आडवाणी सभागृहात संयुक्त बैठक झाली, तेव्हा ते बोलत होते. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, पोलीस उपायुक्त मंचक इप्पर, आनंद भोईटे, सागर कवडे, पालिकेचे सहायक आयुक्त सुचेता पानसरे, प्रशांत जोशी, बापूसाहेब गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे, अर्जुन पवार, पिंपरी मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष श्रीचंद आसवानी, माजी उपमहापौर डब्बू आसवानी, कष्टकरी पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे आदींसह मोठ्या संख्येने व्यावसायिक उपस्थित होते.
खासदार बारणे म्हणाले,की करोनामुळे दोन वर्षे व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे कोणाही व्यापाऱ्याला, दुकानदाराला महापालिका, पोलिसांकडून नाहक त्रास होता कामा नये. व्यापाऱ्यांनीही चुकीच्या पद्धतीने व्यवसाय करू नये. सणासुदीच्या काळात वाहतूक पोलिसांची संख्या वाढवावी. महापालिकेनेही वॉर्डन ठेवावेत. व्यापाऱ्यांनी प्लास्टिकचा वापर करू नये. वाहतूक कोंडी होईल, अशा पद्धतीने कोणीही व्यवसाय करू नये, असे आवाहन बारणे यांनी केले.
फेरीवाल्यांना हटवावे, अशी मागणी करत व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून श्रीचंद आसवानी यांनी व्यापाऱ्यांना विनाकारण त्रास दिला जात असल्याचे सांगितले.बाबा कांबळे म्हणाले,की व्यापाऱ्यांना त्रास होता कामा नये, अशी आमची भूमिका आहे. मात्र, फेरीवाल्यांनाही सांभाळून घेतले पाहिजे. आम्ही आडमुठेपणाची भूमिका घेणार नाही. फेरीवाल्यांचे पोट भरले पाहिजे, याचाही विचार करावा.अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ म्हणाले, ”व्यापारी, फेरीवाले कोणावरही अन्याय होणार नाही. दुकानदार आणि फेरीवाले दोघांनाही न्याय देण्याची पालिकेची भूमिका आहे.