वाढीव टोल एक महिन्यात रद्द केला जाणार असल्याचं आश्वासन सरकारनं दिल्याचं मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं. तसेच, सर्व एंट्री पॉईन्ट्सवर सरकारतर्फे कॅमेरे लागतील. आम्हीही आमचे कॅमेरे लावू ज्यामुळे टोल नाक्यावर किती वाहनं जातात, याची माहिती मिळेल, असं राज ठाकरेंनी दादा भुसे आणि त्यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं. दरम्यान, टोल दरवाढीबाबत राज ठाकरेंच्या शिवाजी पार्क येथील निवासस्थान शिवतीर्थवर बैठक झाली. मंत्री दादा भुसे यांच्यासह अधिकारी शिवतीर्थावर बैठकीसाठी उपस्थित होते. राज ठाकरेंच्या मागण्यांवर सकारात्मक असल्याचं स्वतः दादा भुसेंनी बोलताना सांगितलं.
राज ठाकरे बोलताना म्हणाले की, “मुंबईच्या एन्ट्री पॉईंटवर उद्यापासूनच कॅमेरे लावले जातील. 15 दिवस या सर्व एन्ट्री पॉईंट्सवर सरकार आणि आमच्या पक्षाच्या कॅमेऱ्यांनी लक्ष ठेवलं जाईल, किती गाड्या टोलवरुन जातात, हे कळण्यासाठी ही व्हिडीओग्राफी केली जाणार आहे.” तसेच, काल (गुरुवारी) बैठकीत ठरलेल्या गोष्टी लेखी स्वरुपात आलेल्या नव्हत्या, तिथे असं ठरलं की, आज एक बैठक घेऊन त्या लेखी स्वरुपात तुमच्यासमोर गोष्टी आणाव्यात, असं राज ठाकरेंनी सांगितलं.
4 मिनिटांच्या पुढे टोलनाक्यावर एकही गाडी थांबणार नाही, नाहीतर… : राज ठाकरे
प्रत्येक टोलनाक्यावर 200 ते 300 मीटरपर्यंत पिवळ्या रेषेवर रांग गेली, तर त्यापुढच्या सगळ्या गाड्या टोल न घेता सोडून दिल्या जातील. 4 मिनिटांच्या पुढे टोलनाक्यावर एकही गाडी थांबणार नाही. त्यासाठी तिथे काही पोलीसही थांबतील, अशी माहिती राज ठाकरेंनी दिली आहे.
“काल सहयाद्रीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दादा भुसे यांच्यासोबत बैठक झाली, त्यात काही गोष्टी ठरल्या, लेखी स्वरूपात काही गोष्टी काल आल्या नाही, नंतर मग आज ही बैठक झाली ज्यामध्ये लेखी स्वरूपात काही गोष्टी आल्या आहेत. 9 वर्षानंतर मी सहयाद्रीवर गेलो, त्याच वेळी कळलं होतं की, टोल संदर्भातील अॅग्रीमेंट 2026 पर्यत संपणार होतं, हे मला माहीत आहे, 2026 पर्यंत अॅग्रिमेंट बँकेसोबत झाल्यानं त्यात आता काही करता येत नाही.” असं राज ठाकरे म्हणाले.
पुढचे 15 दिवस या सर्व एन्ट्री पॉईंट्सवर सरकार आणि आमच्या पक्षाचे कॅमेरे लावले जातील : राज ठाकरे
ठाण्यातील 5 एन्ट्री पॉईंट्सवर टोल वाढविण्यात आले, अविनाश जाधव यांनी आंदोलन केलं, त्यात उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी वक्तव्य केलं की, चारचाकी आणि तीन चाकी वाहनांना टोल नाही, लोकांना वाटलं की, आम्हला फसवलं जाताय की काय? टोल घेणार असाल तर तुम्ही कोणत्या सोयीसुविधा दिल्या गेल्या आहेत, त्यांची अंमलबजावणी झालेली नाही, पुढचे 15 दिवस या सर्व एन्ट्री पॉईंट्सवर सरकार आणि आमच्या पक्षाचे कॅमेरे लावले जातील आणि किती गाड्या या टोलवरून जातात हे कळेल ही व्हिडिओग्राफी उद्या पासून सुरू होईल, असंही राज ठाकरे म्हणाले.
अॅम्बुलन्स, स्वच्छतागृह, सीसीटीव्हीचे कंट्रोल मंत्रालयात असेल तिथे लोकांना काय त्रास होतोय ते कळेल, आयआयटी मुंबई कडून करारमधील नमूद उड्डाण पूल यांचे स्ट्रक्चरल ऑडिट केले जाणार आहे, असंही राज ठाकरेंनी सांगितलं.
ठाण्याहून नवी मुंबईला जानाता दोन टोल येतात, तिथे एकच टोल भरावा लागेल : राज ठाकरे
5 रुपये वाढीव टोलबाबत 1 महिन्याचा अवधी सरकारला हवाय, त्यानंतर रद्द करण्याचा निर्णय घेतला जाईल, असं राज ठाकरे म्हणाले. त्याचप्रमाणे ठाण्याहून नवी मुंबईला जानाता दोन टोल येतात, त्यासाठी एकच टोल भरावा लागेल, यासाठी महिन्याभरता निर्णय घेतला जाईल, असं राज ठाकरे म्हणाले. तसेच, महाराष्ट्राबाहेर चांगले गुळगुळीत रस्ते, मात्र महाराष्ट्रात चांगले रस्ते नाहीत. रस्त्यांबाबत यंत्रणा एकमेकांवर ढकलतात, त्यामुळे रस्ते खराब असतील तर टोन भरला जाणार नाही, असंही राज ठाकरेंनी स्पष्ट केलं.
29 ऑक्टोबरपूर्वी 15 जुने टोल रद्द करण्याबाबत राज ठाकरेंनी मागणी केली आहे. मुंबई एन्ट्री पॉईंट, वांद्रे सीलिंक आणि एक्सप्रेवेची कॉग तर्फे चौकशी करण्याची मागणीही राज यांच्याकडून या बैठकीत करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त टोल नाका परिसरात राहणाऱ्या लोकांना सवलतीच्या दरात पास देण्याची मागणी, एवढा टॅक्स गोळा होतोय, तो जातो कुठे? टॅक्स गोळा करतायत तर किमान रस्ते देखील चांगले पाहिजेत, अशा मागण्याही राज ठाकरेंनी केल्या आहेत. याव्यतिरिक्त राष्ट्रीय महामार्गांबाबत केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्याशी देखील चर्चा करणार असल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं आहे.