Saturday, March 2, 2024
Homeताजी बातमीसकाळची शाळा नकोच, राज्यपालांच्या सूचनेला पालकांचाही पाठिंबा

सकाळची शाळा नकोच, राज्यपालांच्या सूचनेला पालकांचाही पाठिंबा

मुलांची झोप पूर्ण होण्याच्या दृष्टीने सकाळच्या शाळांच्या वेळा बदलण्याची सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी केल्यानंतर, त्याला राज्यातील पालक, शिक्षक आणि अभ्यासकांकडून पाठिंबा मिळत आहे. सध्या सकाळच्या सत्रातील शाळा सात वाजताच्या आसपास भरत असून, ही वेळ नऊपर्यंत पुढे नेल्यास मुलांची झोप पूर्ण होऊन शिकण्यात लक्ष लागेल. पालकांची सकाळी पाच वाजल्यापासून होणारी धावपळ कमी होईल, अशी भूमिका पालकांकडून मांडण्यात येत आहे.

‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या अभियानाच्या शुभारंभाप्रसंगी राज्यपाल बैस यांनी सकाळच्या सत्राच्या शाळांच्या वेळा बदलण्याच्या सूचना केल्या. बदलत्या जीवनशैलीनुसार प्रामुख्याने शहरी भागांतील पालकांच्या झोपेच्या वेळा बदलल्या असून, अनेक पालक रात्रपाळी आणि कामानिमित्त रात्री उशिरापर्यंत जागे असतात. त्यामुळे मुलेही रात्री उशिरापर्यंत जागी असतात. त्यातही मुलांचा ‘स्क्रीन टाइम’ वाढला आहे. अनेक मुले रात्री मोबाइल किंवा कम्प्युटर पाहतात.

अशा परिस्थितीत लहान मुलांच्या (पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक) शाळा सकाळी सातच्या आसपास भरतात. त्यासाठी मुलांना पहाटे सहा वाजल्यापासून, तर पालकांना जेवणाचा डबा आणि मुलांची तयारी करण्यासाठी पहाटे पाच वाजताच उठावे लागते. या सर्वांत मुलांची झोप पूर्ण होत नाहीच; शिवाय पालकांनाही धावपळ करावी लागते. या पार्श्वभूमीवर शाळांच्या सकाळच्या वेळा बदलण्याबाबत अधूनमधून चर्चा होते. मात्र, राज्यपाल बैस यांनी सरकारला सूचना दिल्यामुळे, आता पालकांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे सरकार सकाळी भरणाऱ्या शाळांच्या वेळा बदलणार का, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

शाळेत मुले झोपेतच असतात

‘झोपेच्या गणितानुसार शाळेच्या वेळा बदलण्याबाबत सकारात्मक विचार व्हायला हवा. टीव्ही आणि मोबाइलचा वापर वाढला आहे. आई-वडील नोकरी करणारे असल्याने, त्यांच्या कामावरून घरी परतण्याच्या वेळाही रात्री उशिराच्या असतात. अशा वेळी स्वाभाविकपणेच सर्व कुटुंबाला झोपायला उशीर होतो. फक्त शहरातच नाही, तर खेड्यापाड्यातसुद्धा रात्री ११ किंवा त्यानंतर झोपणे अगदी स्वाभाविक मानले जाते. शाळेत जाण्यासाठी म्हणून मुलांना सकाळी लवकर उठवले जाते. अशा वेळी मुले सकाळचे शाळेतीस दोन-तीन घड्याळी तास झोपेतच जातात. त्यामुळे शिक्षकांच्या शिकवण्याकडे त्यांचे लक्ष नसते,’ असे मत सेवानिवृत्त मुख्याध्यापिका मेघना जोशी यांनी मांडले.

काही शाळा अगदी सात वाजता भरवल्या जातात. त्यापेक्षा सकाळी आठ किंवा नऊ ही वेळ अधिक योग्य वाटते. पालक उशिरा जेवणारे, टीव्ही बघत लोळणारे असतील, तर मुलेही तेच करतात. पूर्ण कुटुंबाने मुलांच्या दिनक्रमाप्रमाणे बदल करून मुलांची झोप किमान सात तास झाली पाहिजे, याकडे लक्ष द्यायला हवे.

  • अनुजा जगताप, पालक
    मुलांची झोप त्यांच्या शिकण्यात, लक्षात राहण्याबाबत आणि मेंदूच्या विकासात खूप महत्त्वाची भूमिका बजावते. पालक म्हणून आपण मुलांना चांगले शिक्षण मिळण्याबाबत आग्रही असले पाहिजे. त्याच वेळी त्यांचे आरोग्यही उत्तम राहण्याबाबत काळजी घेणे गरजेचे आहे. चांगल्या सुदृढ आरोग्यासाठी मुलांची झोप हा महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे राज्यपालांच्या म्हणण्याप्रमाणे शाळा उशिराने सुरू होणार असल्यास, पालक स्वागत करतील.
  • प्रीतीश उमाठे, पालक
    राज्यातील अनेक शाळा दोन सत्रांत सुरू आहेत. त्यामुळे सकाळच्या सत्रातील वेळ बदलण्याबाबत निर्णय तातडीने घेणे सोयीचे ठरणार नाही. मुलांच्या झोपेचा आणि शिकण्याचा संबंधांचा शास्त्रशुद्ध अभ्यास अजून झालेला नाही. सरकार प्रायोगिक तत्त्वावर काही शाळांत हा प्रयोग करू शकते. त्यानंतर राज्यभर शाळांच्या सकाळच्या वेळा बदलण्याबाबत विचार करता येईल.
  • महेंद्र गणपुले, प्रवक्ते, मुख्याध्यापक महामंडळ

दोन सत्रांमध्ये भरणाऱ्या शाळांना सकाळच्या शाळांची वेळ बदलणे शक्य होणार नाही. मात्र, सकाळी सातऐवजी आठ वाजता शाळा सुरू करता येतील. पालकांनीसुद्धा शाळा निवडताना, घराच्या जवळील निवडावी. त्यामुळे त्यांचा प्रवासाचा वेळ वाचेल आणि मुलांनाही लवकर शाळेत जाता येईल.

  • जागृती धर्माधिकारी, उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षणसंस्था महामंडळ

जीवनशैली बदला किंवा साडेआठला शाळा भरवा’
‘मुलांची आठ तास झोप झाल्यास, त्यांचा मेंदू चांगल्याप्रकारे काम करतो. बदलत्या जीवनशैलीमुळे रात्री उशिरापर्यंत पालक जागे असल्याने, मुलेही जागतात. अशा वेळी लवकर झोपून, आठ तासांची झोप घेतल्यानंतर सकाळीच शाळेत गेल्यास हरकत नाही. मात्र, पूर्ण झोप न घेता सकाळी सातला शाळेत जाणे हे लहान मुलांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरत आहे. पोट साफ न होणे, मेंदूला आराम न मिळणे याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. सकाळी सातऐवजी साडेआठच्या आसपास शाळा सुरू होऊ शकल्यास, मुले वाहतूक कोंडीपूर्वी शाळेत जातील,’ असे मेंदू अभ्यासक डॉ. श्रुती पानसे यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Ghe Bharari

Most Popular

Recent Comments