नवी दिल्ली : देशासाठी कोरोनाची ही दुसरी लाट असू शकते पण दिल्लीसाठी ही चौथी लाट आहे, असं मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे. दिल्लीत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहेत. ही चिंतेची बाब असून सरकारचं यावर लक्ष आहे. आम्ही आवश्यक ती पावले उचलत आहोत. लॉकडाऊन करण्याचा सध्यातरी विचार नाही. मात्र गरज भासल्यास चर्चेतून निर्णय घेण्यात येईल, असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं.
अरविंद केजरीवाल म्हणाले की, कोरोनाचा प्रसार वेगाने होतो आहे. मात्र कोरोनाची ही लाट मागील लाटेपेक्षा कमी धोकादायक आहे. कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. टेस्टिंग, ट्रेसिंग आणि आयसोलेशन करण्याचे काम अतिशय वेगाने केले जात आहे. सरकारकडून सर्व प्रयत्न केले जात आहेत, मात्र सामान्य लोकांचा सहभाग देखील महत्वाचा आहे. सर्वांनी मास्क घालून सामाजिक अंतर राखले पाहिजे, असं आवाहनही अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं.
बैठकीत केजरीवाल यांनी सांगितलं की, रुग्णालयांमध्ये रुग्णवाहिकांची व्यवस्था, आयसीयूची व्यवस्था, बेड्सची व्यवस्था याबाबत संपूर्ण नियोजन केले आहे. आतापर्यंत कोरोनाची स्थिती दिल्लीकरांनी योग्यरित्या हाताळली आहे. आता सरकार रुग्णालय व्यवस्थापन आणि लसीकरणावर लक्ष केंद्रित करत आहे.
दिल्लीत गुरुवारी 2790 लोकांना कोरोनाची लागण झाली होती आणि 9 रुग्णांचा मृत्यू झाला.