करोनाबाधितांची संख्या कमी झाल्याने आणि सर्व व्यवहार पूर्वपदावर आल्याने नागरिकांचे करोना प्रतिबंधक उपाययोजनांकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. अनेकजण मास्कचा वापर करणेही टाळत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका भवनात मास्क नसणाऱ्या नागरिकांना प्रवेश न देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. पालिकेच्या आवारात विनामास्क नागरिक आढळल्यास त्यांना दंडही ठोठावला जाणार आहे.
करोना प्रतिबंधक लस उपलब्ध झाली असली, तरी करोनावर प्रभावी औषधे अद्याप सापडलेली नाहीत. करोनाबाधितांची, सक्रिय रुग्णांची संख्या सध्या घटली आहे. मात्र, करोनाचे सावट अद्याप कायमच आहे. त्यातच पुण्यासह राज्यात ओमायक्रॉन या आफ्रिकन व्हेरिएंटचे रुग्ण आढळून येत आहेत. महापालिका भवनामध्ये दिवसभर हजारो नागरिकांची वर्दळ असते. विविध परवाने, दाखले, मान्यता, दंड भरणा इत्यादी कामांसाठी शहराच्या विविध भागातून नागरिक येत असतात. पालिकेत मात्र, करोना प्रतिबंधक नियमांच्या पालनाकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून आले आहे. अनेक अधिकारी, कर्मचारी, नगरसेवक, नागरिक आणि ठेकेदारही पालिका भवनात मास्कशिवाय बिनधास्त वावरताना आढळले आहेत. त्यामुळे प्रशासनाने आता पालिकेतील विनामास्क नागरिकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. मास्क नसल्यास महापालिकेत प्रवेश मिळणार नसल्याचे आदेश पालिकेतर्फे काढण्यात आले आहेत.
‘महापालिकेत दररोज विविध कामांसाठी नागरिक येत असतात. बहुतांश लोक मास्कचा वापर करतात. काही मोजकी मंडळी मास्क लावत नाहीत. काहींचा मास्क हनुवटीवर तर काहींचा खिशात असतो. काही जण रूमाल वापरतात. मात्र, आता विनामास्क व्यक्तींना पालिका भवनात प्रवेश दिला जाणार नाही; तसेच विनामास्क फिरणाऱ्या व्यक्तींकडून पाचशे रुपये दंड वसूल केला जाईल. क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातून शहराच्या विविध भागांत विनामास्क नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जाईल,’ अशी माहिती महापालिकेचे उपायुक्त माधव जगताप यांनी दिली.
सुरक्षित वावराचे तीन-तेरा
हजारो नागरिकांची वर्दळ असणाऱ्या महापालिका भवनात सुरक्षित वावराचे तीन तेरा वाजले आहेत. महापालिकेत येणाऱ्या व्यक्तींचे तापमान मोजण्याची व्यवस्था आता बंद झाली आहे. याशिवाय नागरी सुविधा केंद्रासह अन्यत्र कोठेही सुरक्षित अंतरासाठीच्या चौकटी आखलेल्या नाहीत. त्यामुळे करोना प्रतिबंधक उपायांचे पालन केले नाही, म्हणून इतरांना दंड करणाऱ्या पालिका भवनातच करोना प्रतिबंधक नियमांना हरताळ फासल्याचे चित्र आहे.