पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या उद्योग सुविधा केंद्र आणि व्यावसायिक सामाजिक जबाबदारी (सीएसआर सेल) या कक्षांची जबाबदारी मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण यांच्यावर सोपविण्यात आली आहे. याबाबतचे आदेश आयुक्त शेखर सिंह यांनी निर्गमित केले आहेत.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या भौगोलिक कार्यक्षेत्रामधील उद्योजकांचे महापालिकेशी संबधित असणारे प्रश्न तात्काळ निकाली काढण्यासाठी, तसेच कार्याभ्यास व कार्याचे मूल्यमापन करुन नियोजन व विवेकपूर्ण समन्वय साधण्याकरीता एक स्वतंत्र यंत्रणा आवश्यक असल्याने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आस्थापनेवर उद्योग सुविधा केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षाची जबाबदारी कार्यकारी अभियंता शिरीष पोरेडी यांच्याकडे देण्यात आली होती. तसेच शहरातील तांत्रिक उद्योगांना सामाजिक उत्तरदायीत्व म्हणून महापालिकेमार्फत द्यावयाच्या सोयी सुविधांचे कामकाज व्यावसायिक सामाजिक जबाबदारी कक्षामार्फत होत असून याबाबतची जबाबदारी मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
उद्योग सुविधा केंद्र आणि व्यावसायिक सामाजिक जबाबदारी कक्ष या दोन्ही कक्षांकडील कामकाजाचे स्वरुप समान असल्याने या दोन्ही कक्षांची जबाबदारी मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण यांच्याकडे सोपविण्यात आल्याचे आदेशात नमूद केले आहे. या आदेशाची अंमलबजावणी २२ नोव्हेंबर २०२२ पासून करण्यात येत आहे.