शहरात गेल्या काही दिवसांत क्रिकेटच्या सामन्यांवरील सट्टेबाजीचे प्रमाण वाढले आहे. विविध भागांमध्ये आपली यंत्रणा कार्यान्वीत करून सट्टेबाज सट्टे लावत आहेत. पोलिसांनी यापैकी अनेकांवर कारवाई केली आहे. मात्र, अद्यापही क्रिकेटच्या सामन्यांवर सट्टे लावण्याचे काम सुरूच असल्याचे चित्र दिसत आहे.
एप्रिल महिना सुरू झाल्यापासून खंडणीविरोधी पथक, युनिट वन; तसेच स्थानिक पोलिस ठाण्यांनी शहरातील आठ ते दहा सट्टेबाजांवर छापा टाकून त्यांना अटक केली आहे. भारत विरुद्ध इतर कोणत्याही देशाचा सामना; विशेषत: भारत-पाकिस्तान सामना असल्यास शहरातील सट्टेबाज अॅक्शन मोडमध्ये येतात. ‘आयपीएल’चा सीझन म्हणजे सट्टेबाजांचे सुगीचे दिवस समजले जातात. लाखो-करोडो रुपयांची उलाढाल या सट्टेबाजीच्या माध्यामातून केली जाते.
पोलिसांची यंत्रणा कमकुवत
शहरातील विविध भागांत खुलेआमपणे सट्टेबाजी चालते. अनेक सट्टेबाज आपल्या ऑफिस किंवा फ्लॅटमध्ये सट्टे घेण्याचे काम करतात. अनेक व्यावसायिक, स्थानिक बड्या लोकांच्या संपर्कात राहून सट्टेबाजी करतात. मात्र, यातील केवळ हाताच्या बोटावर मोजण्याएवढ्याच लोकांवर पोलिसांकडून कारवाई होत आहे. त्यामुळे पोलिसांची यंत्रणा कमी पडते की काय, असा प्रश्न निर्माण होत आहे.
फोन, ऑनलाइन पद्धतीने सट्टेबाजी…
सट्टा लावण्यासाठी कोठेही जाण्याची गरज नसते. सट्टेबाजांनी आपली ऑनलाइन यंत्रणा सज्ज ठेवली आहे. शहरातील मध्यवर्ती भागापासून ते तळेगाव, चाकण, मोशी अशा भागांमध्ये मोठमोठे रो हाऊस, फ्लॅट भाड्याने घेऊन तेथून हे काम केले जाते. सट्टा लावणाऱ्या ग्राहकांना थेट फोनद्वारे सट्टा लावण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे.
त्यांच्याकडे पोलिसांचे दुर्लक्ष…
क्रिकेटवर सट्टा लावण्याचे काम कोणीही सर्वसाधारण माणूस करत नाही. सट्टेबाजी करणारे लोक पैसेवाले असतात. शहराच्या काही ठरावीक भागातील लहान-मोठे व्यावसायिक क्रिकेटवर सट्टा लावतात. यातील अनेक लोकांची पोलिसांना माहिती आहे. मात्र, त्यांच्यावर कधीही कारवाई होताना दिसत नाही. या लोकांवर कारवाई झाली, तर शहरातील सट्टेबाजीचे प्रमाण नक्कीच कमी होईल, अशी चर्चा सध्या सुरू आहे.
शहरात सट्टेबाजी करणाऱ्यांवर कारवाई सुरू आहे. गेल्या १५ ते २० दिवसांत आठ ते दहा सट्टेबाजांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये अटक झालेल्या आरोपींची संख्या जास्त आहे. स्थानिक पोलिस, युनिटचे अधिकारी, खंडणीविरोधी पथक यांनी वेगवेगळी कारवाईद्वारे सट्टेबाजांना अटक केली आहे. मात्र, अद्यापही सट्टेबाजी सुरू असल्याचे समजते. पोलिस कारवाई करतच आहेत. मात्र, नागरिकांनीही या सट्टेबाजीच्या नादी लागू नये. हा एक प्रकारचा जुगारच असून, सट्टेबाज नागिरकांची हमखास फसवणूक करतात.- अरविंद पवार, वरिष्ठ पोलिस निरिक्षक, खंडणीविरोधी पथक