७ एप्रिल २०२१,
अंबानी यांच्या घराजवळ सापडलेली स्फोटकं आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या सचिन वाझे यांनी राज्याला हादरवून टाकणारा गौप्यस्फोट केला आहे. “आपल्या नियुक्तीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा विरोध होता. ते आपल्याला हटवू इच्छित होते. त्यांचं मतपरिवर्तन करण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती,” असा खळबळजनक दावा सचिन वाझे यांनी एनआयएला लिहिलेल्या पत्रात केला केला आहे. राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेनेचे नेते अनिल परब यांनीही कंत्राटदारांकडून वसुली करण्यास सांगितलं होतं, असा आरोपही वाझे यांनी केला आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यानंतर निलंबित पोलीस अधिकारी वाझेंनींही ‘लेटरबॉम्ब’ टाकला आहे. सध्या एनआयएच्या कोठडीत असलेल्या वाझे यांनी एनआयएला एक पत्र लिहिलं आहे. ज्यात तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर खंडणी मागितल्याचा गंभीर आरोप केला आहे.
वाझे यांनी स्वतःच्या हस्तक्षरात एनआयएला पत्र लिहिलं आहे. “२०२० मध्ये मला पोलिस दलात घेण्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा विरोध होता. माझी नियुक्ती रद्द करण्यात यावी, अशी शरद पवारांची इच्छा होती. मात्र, आपण शरद पवारांचं मतपरिवर्तन करू. त्याचबरोबर गुन्हेगारी गुप्तवार्ता शाखेत नियुक्ती करू, असं तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मला नागपूरमधून फोनवर सांगितलं होतं. या कामासाठी देशमुख यांनी मला दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती,” असा दावा वाझे यांनी पत्रात केला आहे.
पत्राची सत्यता पडताळून कारवाईचे आदेश
दरम्यान, या पत्राची सत्यता तपासून कारवाई करण्याचे आदेश कोर्टाने CBI ला दिले आहेत. या प्रकरणात आता NIA बरोबरच आता CBI कडून प्रत्यक्षरित्या तपासाला सुरुवात होणार आहे. इतकच नाही तर संबंधित पत्रावरुन मॅजिस्ट्रेटसमोर सचिन वाझे यांचा जबाबही नोंदवण्यात आला आहे. लिहिलेल्या पत्रावरुन वाझे यांनी घुमजाव करु नये यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे.
“ऑक्टोबर २०२०मध्ये देशमुख यांनी मला सह्याद्री अतिथी गृहावर बोलावलं होतं. आणि शहरातील १ हजार ६५० रेस्तराँ आणि बार यांच्याकडून वसूली करण्यास सांगितलं होतं. त्यावेळी हे आपल्या क्षमते पलिकडे असल्याचं आपण त्यांना सांगितलं होतं. जुलै-ऑगस्ट २०२० मध्ये अनिल परब यांनी त्यांच्या शासकीय बंगल्यावर बोलावलं होतं. डीसीपींच्या बदल्या होण्याच्या तीन-चार दिवसांआधी परब यांनी बोलावलं होतं. सुरूवातीला SBUTबद्दलच्या तक्रारीची चौकशी करण्यास सांगितलं. त्यानंतर विश्वस्तांना घेऊन येण्यास सांगितलं होतं. त्याचबरोबर चौकशी थांबवण्यासाठी परब यांनी SBUT ५० कोटी रुपये मागितले होते. हे काम करण्यास आपण असमर्थता दर्शवली. कारण आपल्याला SBUTबद्दल माहिती नव्हती. त्याचबरोबर चौकशीवरही आपल कोणतंही नियंत्रण नव्हतं,” वाझे यांनी पत्रात म्हटलं आहे.

शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप
“जानेवारी २०२१ मध्ये मंत्री अनिल परब यांनी आपल्याला पुन्हा शासकीय बंगल्यावर बोलावलं आणि बृहन्मुंबई महापालिकेच्या यादीतील काही ठेकेदारांची चौकशी करण्यास सांगितलं. अशा ५० ठेकेदारांकडून २ कोटी रुपये वसूल करण्यास त्यांनी सांगितलं होतं. अज्ञात तक्रारींच्या आधारावर या प्रकरणाची चौकशी सुरू होती. ठेकेदारांविरोधातील तक्रारींची गुन्हेगारी गुप्तवार्ता शाखा अर्थात क्राईम इंटेलिजन्स विभागाने केलेल्या तपासातून काहीही निष्पन्न झालं नाही,” असं वाझे यांचं म्हणणं आहे.
“मला न्याय द्या”
“जानेवारी २०२१ मध्ये आपण गृहमंत्री अनिल देशमुख यांना त्यांच्या शासकीय बंगल्यावर भेटलो होतो. तिथे त्यांचे पीए कुंदन हे सुद्धा उपस्थित होते. त्यांनी मला १६५० बार आणि रेस्तराँकडून प्रत्येकी ३ ते ३.५ लाख रुपयांची वसूली करण्यास सांगितलं होतं. त्यानंतर मी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना भेटलो होतो आणि त्यांच्याकडे संशय व्यक्त केला होता. कुठल्या तरी खोट्या वादात अडकू अशी भीती व्यक्त केली होती. त्यांनी मला धीर दिला आणि कुणाकडूनही आणि कुणासाठीही अवैध पैसे वसुलीत सहभागी न होण्यास सांगितलं होतं,” असं सांगत वाझे यांनी आपल्याला न्याय देण्यात यावा, असं पत्रात म्हटलं आहे.
