Wednesday, November 11, 2026
Homeमुख्यबातम्याNews14live दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी आमदार शंकर जगताप यांचा मदतीचा हात; ११ लाखांची मदत सुपूर्द

News14live दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी आमदार शंकर जगताप यांचा मदतीचा हात; ११ लाखांची मदत सुपूर्द

मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाकडे धनादेश प्रदान; संकटातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न

पिंपरी : दुष्काळाच्या संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा, या उद्देशाने चंद्ररंग डेव्हलपर्स अँड बिल्डर्सच्या वतीने विजुशेठ जगताप आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांनी पुढाकार घेतला आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाकडे ११ लाख रुपयांची मदत सुपूर्द करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या मदतीचा धनादेश प्रदान करण्यात आला.

पावसाने दडी मारल्याने निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती, पिकांचे नुकसान आणि घटते उत्पन्न यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडतात. शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांच्या उदरनिर्वाहावरही या परिस्थितीचा परिणाम होतो. अशा कठीण काळात शेतकऱ्यांना प्रत्यक्ष आर्थिक मदत मिळणे महत्त्वाचे आहे. याच सामाजिक जाणिवेतून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ११ लाख रुपयांचे योगदान देण्यात आले.

शेती हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधार आहे. शेतकरी संकटात असताना त्यांना मदतीचा हात देऊन त्यांच्या पाठीशी उभे राहणे आवश्यक आहे. दुष्काळग्रस्तांना मदत पोहोचविण्याच्या प्रयत्नांना हातभार लावण्याच्या उद्देशाने ही रक्कम देण्यात आली. यावेळी ॲड. सखाराम कोळसे पाटील, निलेश पवार, प्रवीण जगताप आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार मदतकार्य सुरू राहणार

आमदार शंकर जगताप यांनी पिंपरी-चिंचवड शहरातील गरजू कुटुंबांना शैक्षणिक आणि आरोग्यविषयक कारणांसाठी आर्थिक मदत केली आहे. नागरिकांच्या अडचणीच्या काळात मदतकार्य करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून केला जातो. यंदा महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठीही प्रयत्न सुरू ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

“संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी समाजाने उभे राहावे”

“शेतकरी हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. मात्र, दुष्काळासारख्या संकटामुळे शेतकरी बांधवांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. संकटाच्या काळात शेतकऱ्यांना आपण एकटे नसून संपूर्ण समाज आपल्या पाठीशी आहे, याची जाणीव होणे आवश्यक आहे. याच भावनेतून मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाकडे ११ लाख रुपयांची मदत सुपूर्द केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार समाजातील प्रत्येक घटकाला मदत करण्यासाठी कटिबद्ध आहे,” असे आमदार शंकर जगताप यांनी सांगितले. — शंकर जगताप, आमदार, चिंचवड विधानसभा

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments