देशात मंगळवारी १.१५ लाख नवीन रुग्ण सापडले आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आता देशात एकूण १ कोटी २८ लाख १७८५ लोक कोरोनाबाधित झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर आता न्यूझीलंड सरकारने भारतामधून येणाऱ्या नागरिकांना परवानगी नाकारली आहे. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार ११ एप्रिल ते २८ एप्रिलदरम्यान भारतातून येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला न्यूझीलंडमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. न्यूझीलंडच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार देशात नव्याने आढळून आलेल्या २३ रुग्णांपैकी १७ रुग्ण हे भारतातून न्यूझीलंडमध्ये दाखल झालेले प्रवासी आहेत. त्यामुळेच भविष्यात ही संख्या वाढू नये म्हणून भारतातून येणाऱ्या प्रवाशांना पुढील दोन आठवडे परवानगी नाकारण्यात आलीय.
न्यूझीलंडच्या पंतप्रधान जसिंडा आर्डेन यांनी यासंदर्भातील आदेश दिलेत. भारतामधून येणाऱ्या नागरिकांना देशात प्रवेश करण्यावर तात्पुरत्या स्वरुपाची बंदी घातली आहे. ही बंदी न्यूझीलंडचे नागरीक असणाऱ्या मात्र सध्या भारतात असणाऱ्या व्यक्तींनाही लागू असणार आहे. त्यामुळेच ११ एप्रिल ते २८ एप्रिलदरम्यान कोणत्याही व्यक्तीला भारतामधून न्यूझीलंडला जाता येणार नाही. “या तात्पुरत्या निर्बंधांमुळे अडचणी निर्माण होतील याचा मला अंदाज आहे. मात्र त्याचबरोबरच प्रवाशांच्या माध्यमातून कोरोनासंदर्भात निर्माण होणारा धोका कमी करण्याची जबाबदारी आमच्यावर असल्याने हा निर्णय घ्यावा लागत आहे,” असंही आर्डेन यांनी स्पष्ट केलं आहे.