२१ डिसेंबर २०२०,
ब्रिटनची राजधानी लंडनसह पूर्व इंग्लंड करोनाच्या नव्या प्रकाराच्या विषाणूचा संसर्ग वेगाने फैलावत आहे. काही दिवसांपूर्वी हा विषाणू आढळला होता. या विषाणुमुळे बाधितांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे सरकारने लॉकडाउनचे निर्बंध लागू केले होते. आता मात्र, या विषाणूच्या वाढत्या प्रभावामुळे युरोपीयन देशांसह इतर देशांनीही ब्रिटनमधील विमान सेवेवर बंदी घातली आहे. करोनाचा हा नवीन प्रकार फक्त ब्रिटनपुरतं मर्यादित न राहता इटली, नेदरलँड्स, डेन्मार्क, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेत फैलावला आहे.
ब्रिटनमध्ये आढळलेला नव्या प्रकारचा करोना विषाणू हा आधीच्या विषाणूपेक्षा ७० टक्के अधिक वेगाने फैलावतो. लंडन आणि दक्षिण इंग्लंडच्या भागात हा विषाणू वेगाने फैलावण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. बाधितांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे रविवारपासून कठोर नियमांसह लॉकडाउन सुरू करण्यात आला. त्यामुळे लाखो नागरिकांवर पुन्हा एकदा घरातच थांबवण्याची वेळ आली.
नेदरलँड्सने ब्रिटन दरम्यान सुरू असणाऱ्या विमान सेवेवर या वर्षाखेरपर्यंत बंदी घातली आहे. तर, बेल्जिअमने २४ तासांची बंदी घातली आहे. त्याशिवाय बेल्जिअमने ब्रिटनसोबतची रेल्वे सेवाही स्थगित केली आहे. तर, जर्मनी, फ्रान्स, ऑस्ट्रिया, इटली यांनीदेखील ब्रिटनसोबतची विमान सेवा स्थगित केल्याची घोषणा केली आहे. तर, खबरदारीची उपाययोजना म्हणून सौदी अरेबियाने आपली सागरी आणि हवाई सीमा बंद केली आहे. ब्रिटनमध्ये नव्या प्रकारचा करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी युरोपीय संघातील देश चर्चा करणार आहेत. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी लंडन आणि जवळपासच्या परिसरात लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर युरोपीयन संघातील देश सतर्क झाले आहेत.
करोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता, लंडन आणि दक्षिण इंग्लंडसह अनेक भागात लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. नागरिकांना घराबाहेर न पडण्याची सूचना देण्यात आली आहे. त्याशिवाय घराबाहेरील व्यक्तिंनाही भेटण्यास मनाई करण्यात आली आहे. हे निर्बंध नाताळा दरम्यानही असणार आहेत. तर, सौम्य प्रतिबंध लागू केलेल्या भागातही नाताळादरम्यान २५ डिसेंबर रोजी तीन कुटुंबियांना एकत्र येण्यास परवानगी असणार आहे. मात्र, ही परवानगी पाच दिवस नसणार.