गेल्या वर्षी अचानक लॉकडाऊन आणि इतर निर्बंध लावण्यात आल्याने चित्रपटसृष्टीला धक्का बसला होता. आता मात्र या क्षेत्राने कामाच्या ठिकाणी काही निर्बंध स्वतःच घालून घेण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबईमध्ये होणारी चित्रीकरणे सुरक्षित वातावरणात पार पडावे यासाठी फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉयीज (FWICE) या संघटनेने चित्रपटक्षेत्रासाठी काही नवे नियम लागू केले आहेत. महाराष्ट्रातली वाढती कोरोनाची रुग्णसंख्या, त्या अनुषंगाने प्रशासनाने घालून दिलेले निर्बंध, अंशतः लॉकडाऊन, रात्रीची संचारबंदी या सर्वांच्या पार्श्वभूमीवर हे नियम लागू करण्यात आले आहेत. या नियमांचं पालन होत आहे का यावर लक्ष ठेवण्यासाठी संघटनेने एक पथकही नियुक्त केलं आहे. हे नियम ३० एप्रिलपर्यंत बंधनकारक असतील.
या संघटनेचे अध्यक्ष, बी. एन.तिवारी, सचिव अशोक दुबे, खजिनदार गंगेश्वर श्रीवास्तव आणि मुख्य सल्लागार शरद शेलार आणि अशोक पंडीत यांनी याविषयी माहिती दिली आहे. ते म्हणतात, “आमच्या सर्व अधिकाऱ्यांनी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा केली आहे आणि त्यांना सर्व नियम पाळले जातील अशी खात्रीही संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे.”
असे असतील नवे नियम
-गर्दीचे सीन आणि अनेक डान्सर्स असलेल्या गाण्याच्या चित्रीकरणावर बंदी असेल.
-सेटच्या परिसरात, कार्यालयांमध्ये, स्टुडिओंमध्ये सतत सॅनिटायजेशन होईल आणि या परिसरात मास्क वापरणे बंधनकारक असेल.
-संघटनेचं एक पाहणी पथक सेट आणि स्टुडिओची सतत पाहणी करेल आणि नियमांची अंमलबजावणी होत आहे का याची खातरजमा करेल.
-या नियमांचा भंग करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.