कोयता वापरून घडणाऱ्या गुन्ह्यांची संख्या वाढत असतानाच सदाशिव पेठेत भरदिवसा तरुणीवर झालेल्या कोयता हल्ल्यानंतर मात्र पुणे पोलीस खडबडून जागे झाले आहेत
मुळशी पॅटर्न सिनेमात ज्या प्रकार कोयत्या गँगने दहशत माजवली होती. तसाच रिअल प्रकार गेल्या काही दिवसांपासून पुण्यात पाहण्यास मिळतोय. रोज रस्त्यावर हल्ले, केक कापणे असे प्रकार सर्रास घडत आहे. त्यामुळेच आता पुणे पोलिसांनी आता डिटेक्शन ब्रांच आणि बिट मार्शलला पिस्तुल देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी या सगळ्या खास प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
कोयता गँगला रोखणं पुणे पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे. त्यासाठी पुणे पोलिसांनी 32 पोलीस ठाण्यातील 70 ते 80 कर्मचाऱ्यांना पिस्तुल देण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यात कोयता गँगचा कहर सुरू असतानाच मागील काही घटनांवरुन महिला सुरक्षिततेचा मुद्दा देखील ऐरणीवर आला आहे. त्यामुळे पिस्तुलाचा उतारा यावर कारगर ठरणार का? असा प्रश्न आहे.
कोयता वापरून घडणाऱ्या गुन्ह्यांची संख्या वाढत असतानाच सदाशिव पेठेत भरदिवसा तरुणीवर झालेल्या कोयता हल्ल्यानंतर मात्र पुणे पोलीस खडबडून जागे झाले आहेत. वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी नवीन उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.
नागरिकांच्या छोट्या तक्रारी गांभीर्याने घेणे, रस्त्यावरच पोलिसांची गस्त, वावर वाढवणे आणि पोलिसांचा धाक निर्माण करणे अशी गोष्टी पुणे पोलिसांनी प्रामुख्याने करणे गरजेचं आहे. कर्मचाऱ्यांना दिलेल्या पिस्तुलाचा उपयोग केवळ दिखाव्यापुरता असणार की वेळ पडल्यावर त्याचा वापर करण्याची परवानगी ही कर्मचाऱ्यांना मिळणार यावर या निर्णयाच यश अवलंबून आहे.